रायगडच्या समुद्रात पाकिस्तानी बोट? सुरक्षा यंत्रणा सतर्क
रायगड जिल्ह्यातील कोर्लई भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोर्लईच्या समुद्रात रडारवर एक संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीतून काही लोक भारतीय किनाऱ्यावर उतरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रडार यंत्रणेला मिळालेल्या माहितीवरून पोलिसांची रात्रभर धावपळ झाली. जिल्ह्यात जागोजागी नाकाबंदी, तपासणी आणि झाडाझडती करण्यात आली. सध्या कोर्लई किनाऱ्यावर कोणतीही संशयास्पद हालचाल आढळली नसली तरी सुरक्षा यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यास नकार देण्यात आला असून या प्रकरणात गुप्तता पाळली जात आहे.