म्यानमार भूकंप: मशीद कोसळून ७०० हून अधिकांचा मृत्यू

मंडाले: म्यानमारमध्ये शुक्रवारी आलेल्या ७.७ रिश्टर स्केलच्या
भूकंपात मोठा विध्वंस झाला. प्रार्थनेसाठी गर्दी असलेल्या मशिदी कोसळल्याने सुमारे
७०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्प्रिंग रिव्होल्यूशन म्यानमार मुस्लिम
नेटवर्कच्या सुकाणू समितीचे सदस्य तुन की यांनी दिली. भूकंपामुळे देशातील सुमारे
६० मशिदींचे मोठे नुकसान झाले किंवा त्या संपूर्ण उद्ध्वस्त झाल्या आहेत. दरम्यान, लष्करी नेतृत्वाखालील सरकारच्या
माहितीनुसार, भूकंपात आतापर्यंत १,७००
पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून ३,४०० जण जखमी झाले
आहेत. याशिवाय ३०० हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. सरकारी प्रवक्ते
मेजर जनरल झॉ मिन तुन यांनी सरकारी प्रसारमाध्यम एमआरटीव्हीला दिलेल्या
माहितीनुसार, भूकंपामुळे राजधानी नैपिटाव आणि मंडालेसह अनेक
भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दूरसंचार यंत्रणा खंडित झाल्यामुळे
आणि दुर्गम भागांमध्ये मदतकार्य पोहोचवणे कठीण असल्यामुळे प्रत्यक्ष मृतांचा आकडा
अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा
शोध सुरू आहे.