राज्यात धरणांमध्ये केवळ ३७ टक्के पाणीसाठा

मुंबई : राज्यातील तापमान वाढत असताना धरणांमधील
पाणीसाठाही कमी झाला आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या
आकडेवारीनुसार सोमवारी राज्यातील सर्व प्रमुख धरणांत सरासरी ३७.२६ टक्के पाणीसाठा
शिल्लक असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा
समाधानकारक असला तरी उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता परिस्थिती चिंताजनक असल्याचे
चित्र आहे. पुण्यातील एकूण ३५ प्रमुख धरणांमध्ये एकूण ३१.११ टक्केच पाणीसाठा
शिल्लक आहे. गेल्या वर्षी राज्यातील प्रमुख धरणांमध्ये याच कालावधीत ३०.६२ टक्के
पाणीसाठा नोंदविण्यात आला होता. तसेच या शिल्लक पाणीसाठ्यापैकी केवळ १०८२९.१० द.ल.घ.मी. इतकाच उपयुक्त पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले
आहे.
राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने सोमवारी राज्यातील प्रमुख १३८धरणांमधील पाणीसाठ्याची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये सोमवारपर्यंत ३७.२६ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. यात सर्वाधिक पाणीसाठा हा अमरावती जिल्ह्यात असून अमरावीतील एकूण १० धरणांमध्ये ४४.१८ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या वर्षी हा आकडा ४१ टक्क्यांवर होता. अमरावतीपाठोपाठ नाशिक येथील सर्व प्रमुख २२ धरणांमध्ये ४३.९४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती या अहवालाच्या माध्यमातून समोर आली आहे. तर, कोकणातील धरणांत ४०.४५ टक्के, छत्रपती संभाजीनगर येथील धरणांत ४२.६९ टक्के, नागपूर येथील धरणांत ३८.०० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्हानिहाय आकडेवारीवर नजर टाकली असता सर्वात कमी पाणसाठी पुण्यातील धरणांत नोंदविण्यात आला आहे. पुण्यातील एकूण ३५ प्रमुख धरणांमध्ये एकूण ३१.११ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. पुण्यातील या शिल्लक पाणीसाठ्यांमध्ये एकूण ६७५१.७१ द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक आहे. याशिवाय, राज्यातील मध्यम प्रकल्पातील धरणांत ४७.५५ टक्के, लघु प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धरणांमध्ये ३६.७७ टक्के आणि महाराष्ट्र राज्य प्रकल्पामध्ये एकूण ३८.५८ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.