ऑनलाइन गेम मुळे झाला गेम; सहावीच्या विद्यार्थ्यांनी सहा लाख रुपये गमावले.

कोल्हापूर :- ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनातून
शेतकऱ्याच्या कुटुंबावर मोठं आर्थिक संकट ओढवलं आहे. राधानगरी तालुक्यातील एका
शेतकऱ्याने म्हशींचा गोठा करण्यासाठी सात लाख रुपये बँक खात्यात साठवले होते.
मात्र, त्याच्या सहावीतील मुलाने फ्री फायर (Free
Fire) गेम खेळताना फोनपे (PhonePe) अॅप
वापरलं आणि यातूनच सायबर गुन्हेगारांनी पाच लाख रुपये लंपास केले. शेतकऱ्याने
मिळवलेल्या माहितीनुसार, म्हशी खरेदीसाठी आधीपासूनची बचत आणि
सध्याचे दूध बिल असे मिळून खात्यात सुमारे सात लाख रुपये होते. या पैशातून
हरियाणातून चार म्हशी खरेदी करण्याचा त्यांचा बेत होता. मात्र बँक खात्यावर
उरलेल्या रकमेची खात्री करण्यासाठी ते शाखेत गेले असता, केवळ
दोन लाख रुपयेच शिल्लक असल्याचे लक्षात आले.
शेतकऱ्याचा मुलगा सहावी इयत्तेत
शिकतो आणि तो मोबाईलवर फ्री फायर गेम खेळायचा. खेळात डिजिटल शस्त्र खरेदी
करण्यासाठी त्याने फोनपे अॅपद्वारे व्यवहार केले. त्याच दरम्यान काही अप्लिकेशन्स
त्याच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झाली आणि हॅकर्सना बँक खात्याची माहिती मिळाली. बँकेचे
स्टेटमेंट तपासल्यावर अनेक ऑनलाइन व्यवहार झाल्याचे दिसून आले. यानंतर बँकेने
पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला. शेतकऱ्याने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
केली असून, तपासात काही रक्कम
फ्री फायर गेममध्ये वापरल्याचे आणि उर्वरित रक्कम अन्य अकाउंट्समध्ये वळवली
गेल्याचे समोर आले आहे. हा प्रकार समजताच कुटुंबाला धक्काच बसला. शेतकऱ्याने
नागरिकांना ऑनलाईन गेम आणि सायबर सुरक्षेबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.