कांदा दरातील घसरण सुरूच संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले
.jpeg)
नाशिक : गेल्या महिन्याभरापासून कांदा दरातील घसरण सुरूच असून, सरासरी दर १४०० रुपयांपर्यंत खाली आल्याने दर सुधारण्यासाठी केंद्राने कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क हटविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने आक्रमक पवित्रा घेत सोमवारी (दि.13) लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद पाडले. तसेच निर्यातशुल्क न हटविल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा संघ टनेचे अध्यक्ष भारत दिघोळे दिला आहे. लासलगाव बाजार समितीत सोमवारी सकाळच्या सत्रात लिलाव सुरू होताच कांदादरात मोठी घसरण झाली. नवीन लाल कांद्याला कमीत कमी 700, सरासरी 1825, तर जास्तीत जास्त 2332 रुपये प्रतिक्विंटल दर मिळला. त्यामुळे राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिघोळे यांनी केंद्र सरकारने कांद्यावरील सध्या लागू केलेले २० टक्के निर्यातशुल्क तत्काळ रद्द करून शून्य टक्के करावे व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी करत घोषणाबाजी करत लिलावाला विरोध केला. यावेळी दिघोळे यांनी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातशुल्क न हटविल्यास राज्यव्यापी रस्ता रोको, रेल रोको आंदोलनाबरोबरच बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद पाडण्याचा इशारा दिला.