डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येच्या घटनेला महिना पूर्ण महिन्यानंतरही तपास सुरूच; संशयित मुसळे न्यायालयीन कोठडीत
.jpeg)
सोलापुर, दि. 17-एस. पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेसचे संस्थापक तथा प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेला रविवारी एक महिना पूर्ण झाला. या महिन्याभराच्या कालावधीत पोलिसांनी कसून तपास केला. तरी अजूनही तपास पूर्ण झालेला नाही. यातील प्रमुख संशयित आरोपी त्यांच्याच रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा महेश माने-मुसळे ही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
डॉ. वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मोदी परिसरातील सोनामाता शाळेच्या शेजारी असलेल्या बंगल्यात स्वतः च्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात दोन गोळ्या झाडून घेतल्या. त्यातील एक गोळी डोक्यातून आरपार गेली. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना कुटुंबीयांनी तातडीने रामवाडी येथील त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली होती. शहरातील नामवंत डॉक्टराने आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. डॉक्टरांनी एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले याबाबत शहर वासियांमध्ये तर्कवितर्क सुरू झाले. पोलिसांनी सर्व अंगाने तपास सुरू केला. त्यानुसार पोलिसांनी वळसंगकर हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे हिच्याविरुद्ध डॉ. अश्विन वळसंगकर यांनी सदर बझार पोलिसात फिर्याद दिली. मुसळे हिने तिचे अधिकार कापले आहेत, पगार कमी केला आहे, मी दोन्ही मुलांना मारणार आणि येथे हॉस्पिटलमध्ये येऊन पेटवून घेणार आणि त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार राहाल, असा धमकीचा ईमेल डॉक्टरांना पाठवला होता. त्यांच्या या खोट्या आरोपामुळे डॉ. शिरीष वळसंगकर हे व्यथित झाले होते. त्या धमकीवजा पत्रामुळे त्यांनी तिच्या त्रासाला कंटाळून पिस्तूलने गोळी झाडून आत्महत्या केली हे तपासात पुढे आले. त्यानंतर तिला अटक करण्यात आली.
मुसळेला 23 एप्रिल पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली. कोठडीत असताना मुसळेची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. तिच्या कार्यालयाची पोलिसांकडून झडती घेण्यात आली. त्यानंतर तिच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली. पोलिसांनी हॉस्पिटलमधील कर्मचार्यांचे जबाब घेतले. त्यानंतर पोलीस कोठडीचा हक्क राखून पोलिसांनी मनिषाला न्यायालयीन कोठडी घेतली. 28 एप्रिलला मुसळेचा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.
पोलिसांचा तपास सुरू असताना मुसळेच्या वाढीव पोलीस कोठडीसाठी न्यायालयाने पोलिसांचे प्रोडक्शन वॉरंट मंजूर केले. 12 मे रोजी पोलिसांनी मुसळेला न्यायालयात हजर केले. मुसळेच्या बँक खात्यात 39 लाख रुपये दिसून आल्याने तपास करण्यासाठी पोलीस कोठडी मागितली. न्यायाधीशांनी तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. ही मुदत संपल्यानंतर 15 मे रोजी पुन्हा पोलीस कोठडीचा हक्क अबाधित राखून तिला न्यायालयीन कोठडी मागण्यात आली. पोलीस पुन्हा आवश्यकतेनुसार तिची पोलीस कोठडी घेऊन तपास करणार असल्याचे सांगण्यात येते. गेल्या महिन्याभरात अशा पद्धतीने घडामोडी घडल्या असून पोलिसांच्या तपासात आणखी काय निष्पन्न होणार, आणखी आरोपी वाढणार का? याकडे शहर व जिल्हावासियांचे लक्ष लागून
आहे.