कलबुरगी येथे मराठी भाषा दिनानिमित्त उद्या पुस्तक प्रकाशन,पुरस्कार प्रदान व बहुभाषा कविसंमेलन

कलबुरगी : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ मुंबई व कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुरगी यांचे संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रविवार दि. २ मार्च रोजी सकाळी १० -३० वाजता येथील आयडियल फाईन आर्ट सोसायटीच्या आर्ट गॅलरी सभागृहात पुस्तक प्रकाशन, पुरस्कार प्रदान व बहुभाषिक कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. करामसापचे गौरवाध्यक्ष डॉ.दिनकर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाचे उदघाटन आळंदचे आमदार व राज्य नीती व योजना आयोगाचे उपाध्यक्ष बी.आर.पाटील यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी जेष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रो.आर.के.हुडगी, वैज्ञानिक व जेष्ठ मराठी साहित्यिक डॉ. राजेंद्र पडतुरे बेंगळूरु, जिल्हा कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष विजयकुमार तेगलतिप्पी, आयडियल सोसायटीचे कार्यवाह डॉ.व्ही.जी.अंदानी, प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. एन.जी.घनाते व डॉ. किशोर देऊळगांवकर हे साहित्य आस्वादक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती करामसापचे अध्यक्ष व अ.भा.मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष गुरय्या स्वामी यांनी दिली. या कार्यक्रमात ' रात्र भरात आहे ' या डॉ. देविदास फुलारी नांदेड यांच्या मराठी काव्यसंग्रहाचा डॉ.संध्या राजन अणवेकर बेंगळूरू यांनी अनुवादित केलेल्या " इरुळू अरळिदे " या कन्नड तसेच डॉ.संध्या अणवेकर यांच्याच " काजव्यांची दिंडी " या मराठी काव्यसंग्रहाचे प्रकाशन बी.आर.पाटील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. नंतर करामसापच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात करामसाप बेंगळुरू विभाग गौरवाध्यक्ष डॉ. राजेंद्र पडतुरे पुरस्कृत " मराठी भाषा कायकरत्न पुरस्कार " जेष्ठ साहित्यिक व कवयित्री अनघा तांबोळी मुंबई यांना तर करामसापचे कोषाध्यक्ष मिलींद उमाळकर पुरस्कृत " मराठी भाषा कल्याण रत्न पुरस्कार " जागतिक कीर्तीच्या चित्रकार, शिल्पकार व स्थापत्य विशारद डॉ.पुष्पा शरद द्रविड बेंगळुरू यांना प्रदान करण्यात येणार आहेत. यानंतर मराठवाडा साहित्य परीषदेचे जेष्ठ कवि डॉ. देविदास फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये मराठी, कन्नड, हिंदी, ऊर्दू व तूळू भाषिक ३३ कवी सहभागी होऊन आपल्या कविता सादर करतील. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करामसापचे उपाध्यक्ष बी.ए.कांबळे, सरकार्यवाह प्रा.विजयकुमार चौधरी, कार्यवाह प्रभाकर सलगरे व कोषाध्यक्ष मिलिंद उमाळकर व अन्य पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.