सोलापूरमध्ये ओला इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग; बाप–लेकाचा थरारक बचाव, CCTV फुटेज व्हायरल

सोलापूर शहरात ओला इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेत वडिलांनी प्रसंगावधान राखत मुलासह तात्काळ स्कूटरपासून दूर उडी मारल्याने मोठी दुर्घटना टळली. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

CCTV मध्ये नेमकं काय दिसतं?

व्हायरल फुटेजमध्ये एक व्यक्ती आपली ओला इलेक्ट्रिक स्कूटर रस्त्याच्या कडेला उभी करून मुलाची वाट पाहत असल्याचे दिसते. काही क्षणांतच मुलगा स्कूटरच्या फूटबोर्डवर उभा राहतो आणि वडील गाडी सुरू करण्याच्या तयारीत असतात. मात्र, त्याच वेळी स्कूटरच्या सीटखालून अचानक धूर निघू लागतो. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता मुलाला स्कूटरपासून दूर नेले आणि स्वतःही सुरक्षित अंतरावर गेले. क्षणात भडकली आग काही सेकंदांतच धुराचे रूपांतर आगीत झाले. स्कूटरचे टायर आणि मागील भाग जळू लागला. आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ धाव घेत पाणी टाकल्याने आग आटोक्यात आली. या घटनेत बाप–लेक थोडक्यात बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचं कारण अस्पष्ट या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, तांत्रिक तज्ञांच्या मते ईव्ही गाड्यांमध्ये बॅटरी पॅक, शॉर्ट सर्किट किंवा ओव्हरहिटिंगमुळे अशा प्रकारच्या घटना घडू शकतात. ओला इलेक्ट्रिकची प्रतिक्रिया नाही या घटनेवर ओला इलेक्ट्रिककडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, यापूर्वी अशा घटनांनंतर कंपनीने त्यांच्या बॅटरी पॅक जागतिक मानकांनुसार असल्याचे आणि अनेक सुरक्षा चाचण्यांनंतरच वाहन बाजारात आणले जात असल्याचे स्पष्ट केले होते. पुणे आणि बंगळुरूमध्ये यापूर्वीही ओला स्कूटरला आग लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या घटनेनंतर इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.