शहराच्या दुहेरी जलवाहिनीच्या; कामाला मुदतवाढ कशासाठी?

सोलापूर: सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी करण्यात येत असलेल्या समांतर दुहेरी जलवाहिनीचे काम महिनाभरात पूर्ण होणार असल्याचे महापालिका आयुक्त सांगत असताना त्या कामासाठी पुन्हा मुदतवाढ कशासाठी देण्यात आली, असा सवाल आमदार देवेंद्र कोठे यांनी केल्यानंतर या विषयावर चर्चा झडली आणि समांतर जलवाहिनीच्या कामाचे बिंगच फुटले. समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले तरी शहरवासियांना दररोज पाणीपुरवठा होणारच नसून पूर्वीप्रमाणेच तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण पाणी साठवण्यासाठी व त्या पाण्याचे शुध्दीकरण करण्याची यंत्रणाच महापालिकेकडे नसल्याचे सांगत महापालिका अधिकार्‍यांनी हात वर केले आहेत. गुरुवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार कोठे हे शहराच्या दररोज किंवा दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून चांगलेच आक्रमक झाले आणि महापालिका प्रशासनावर आपला संताप व्यक्त केला. आमदार कोठे यांनी शहरातील नागरिकांच्यादृष्टीने जिव्हाळ्याच्या असलेल्या पाणीपुरवठ्याचा विषय उपस्थित करून लक्ष वेधले. समांतर जलवाहिनीच्या कामाला अजून किती दिवस लागतील, ही जलवाहिनी झाली तरी आठ दिवसाआड पाणी का?, आदी मुद्दे उपस्थित करीत प्रशासनाला धारेवर धरले. दुहेरी जलवाहिनीच्या कामात अनेक अडथळे आले. त्यावर मात करीत पुढे चाललो आहोत. त्यामुळे विलंब होत आहे. परंतु स्मार्ट सिटी बोर्डाने ठरवून दिलेल्या वेळेपूर्वी काम पूर्ण होईल, असा दावा महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केला. 

वनविभागाची जागा पालिकेने खरेदी करावी

वनविभागाची जागा ताब्यात मिळत नसल्याने दुहेरी जलवाहिनीसाठी अडचण येत असल्याचे यावेळी निदर्शनास आल्यानंतर जागा ताब्यात नसताना निविदा प्रक्रिया का राबविली, असा सवाल आमदार देवेंद्र कोठे यांनी केला. त्यावेळी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले म्हणाल्या की, आम्ही पाठपुरावा करीत आलो आहोत. ते काय एक-दोन दिवसाचे काम नाही. तर पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, वनविभागाच्या जागेबाबत सरकारदरबारी प्रयत्न करू, पण यश येईल असे वाटत नाही. जागेसाठी सरकारने पैसे दिले नाहीत तर महापालिकेने स्वत: खरेदी करण्याची तयारी ठेवावी. कारण एवढी मोठी जागा आणि ती महापालिकेलाच मिळणार आहे, अशी युक्ती लढवत महापालिकेला पैसे तयार ठेवण्याची सूचना केली. तसेच नवीन योजना अमलात आल्यानंतर पाणी येईल मात्र जलशुध्दीकरणाची सोय नसल्याने पूर्वीप्रमाणेच पाणीपुरवठा होणार असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.