मोरोक्कोतील बकरी ईदला कुर्बानी नाही, राजाचा धक्कादायक निर्णय

रबात, मोरोक्को – आगामी बकरी ईद 2025 (ईद-उल-अजहा) या वर्षी 6 आणि 7 जून रोजी साजरी होणार असली तरी, इस्लामिक राष्ट्र मोरोक्कोने यंदा कुर्बानी (प्राण्यांचे बलिदान) करण्यावर बंदी घालून खळबळ उडवली आहे. ९९ टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या देशात घेतलेल्या या निर्णयामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राजा मोहम्मद सहाव्यांच्या शाही फर्मानानुसार, कोणत्याही नागरिकाने ईदच्या दिवशी बकरा किंवा इतर प्राण्याची कुर्बानी देऊ नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करताना सुरक्षा यंत्रणांनी देशभरात प्राण्यांच्या विक्रीवर बंदी घातली असून, बलिदानासाठी लपवून ठेवलेले प्राणी जप्त करण्यात येत आहेत. राजाने हा निर्णय देशात भीषण दुष्काळ आणि प्राण्यांची घटती संख्या लक्षात घेऊन घेतल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “या वर्षीचा बकरी ईदचा सण प्रार्थना, आत्मपरीक्षण आणि गरिबांना दान देऊन साजरा करावा.” या आदेशानंतर मोरोक्कोमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक नागरिकांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. सोशल मीडियावरही नागरिक आणि धार्मिक नेत्यांनी यावर टीका केली आहे. अनेकांनी सरकारवर धार्मिक हस्तक्षेपाचा आरोप केला आहे. मुस्लिम जगतातूनही या निर्णयावर नाराजी व्यक्त होत आहे. काहींच्या मते हा निर्णय इस्लामच्या धार्मिक परंपरांचा अपमान करणारा आहे. तर काहींनी या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले की, सध्याची आर्थिक व पर्यावरणीय परिस्थिती पाहता राजाचा निर्णय योग्य आहे.
बकरी ईदचे धार्मिक महत्त्व:
बकरी ईद इस्लाममधील दोन प्रमुख सणांपैकी एक आहे. या दिवशी मुस्लिम
धर्मीय अल्लाहच्या मार्गात बलिदान देतात. प्रेषित इब्राहिम यांनी आपल्या प्रिय
गोष्टींचे बलिदान देण्याचा जो संदेश दिला, त्याचे प्रतीक
म्हणून प्राण्याची कुर्बानी दिली जाते. ही कुर्बानी गरिबांमध्ये अन्न वाटण्यासाठी
वापरली जाते. मोरोक्कोतील बंदीमुळे या वर्षीच्या
ईद-उल-अजहावर धार्मिक, सामाजिक आणि राजकीय
वाद निर्माण झाला असून, याचा परिणाम मुस्लिम देशांतील
धर्मनिष्ठ नागरिकांच्या भावना आणि सरकारविषयीच्या दृष्टिकोनावर होण्याची शक्यता
आहे.