नायजेरियात आयसिसवर अमेरिकेचा जोरदार हवाई हल्ला; ट्रम्प यांच्या आदेशानुसार एअर स्ट्राइक
अबुजा / वॉशिंग्टन: नायजेरियातील
आयसिस (ISIS) दहशतवादी संघटनांविरोधात अमेरिकेने मोठी कारवाई करत एअर स्ट्राइक केल्याची
माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सोशल
मीडियावर पोस्ट करत या हवाई हल्ल्यांचे आदेश दिल्याची माहिती दिली आहे. ऑक्टोबर
महिन्यात नायजेरियातील आयसिस दहशतवाद्यांनी ख्रिश्चन नागरिकांची निर्घृण हत्या
केली होती. या घटनेचा बदला घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात
आहे. अमेरिकन सैन्याने ईशान्य आणि वायव्य नायजेरियामधील आयसिसच्या दहशतवादी तळांना
लक्ष्य करून अचूक हवाई हल्ले केले. या हल्ल्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर
व्हायरल झाले असून त्यामध्ये दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येत आहे. या
कारवाईबाबत नायजेरियन सरकारने अधिकृत निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे
की, दहशतवाद आणि हिंसक अतिरेकीपणाचा मुकाबला करण्यासाठी
नायजेरिया अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत सातत्याने सुरक्षा आणि गुप्तचर
सहकार्य करत आहे. या सहकार्याचाच एक भाग म्हणून वायव्य नायजेरियातील दहशतवादी
ठिकाणांवर अचूक हवाई हल्ले करण्यात आले.
परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण
नायजेरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात सांगितले की,
हे सहकार्य आंतरराष्ट्रीय नियम आणि द्विपक्षीय करारांनुसार करण्यात
आले आहे. यामध्ये गुप्तचर माहितीची देवाणघेवाण, धोरणात्मक
समन्वय आणि इतर आवश्यक मदतीचा समावेश आहे. सर्व कारवाया आंतरराष्ट्रीय कायद्यांचे
पालन करत, नायजेरियाच्या सार्वभौमत्वाचा आदर राखून करण्यात
आल्या आहेत. नायजेरियन सरकारने स्पष्ट केले की, दहशतवादविरोधी
सर्व प्रयत्नांचा मुख्य उद्देश नागरिकांची सुरक्षा, राष्ट्रीय
एकतेचे संरक्षण आणि सर्व नागरिकांचे हक्क व प्रतिष्ठा जपणे हा आहे. कोणत्याही धर्म
किंवा वांशिकतेच्या समुदायाविरुद्ध दहशतवादी हिंसाचार नायजेरियाच्या मूल्यांना आणि
आंतरराष्ट्रीय शांततेला विरोधी असल्याचेही सरकारने नमूद केले आहे.