राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत बिघडल्याचे वृत्त; सर्व कार्यक्रम रद्द

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत बिघडल्याचे वृत्त आहे. खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे शरद पवार यांना डॉक्टरांनी तातडीने विश्रांती सुचवली आहे. यानुसार पुढील चार दिवसांचे सर्व दौरे आणि कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. ए एन आय या आघाडीच्या वृत्तसंस्थेने पवारांच्या आजाराबद्दल अधिकृत वृत्त दिले आहे. आगामी चार दिवसातील कार्यक्रम रद्द झाल्याचेही ए एन आय ने आपल्या एक्स ट्विटर अकाउंट वरून म्हटले आहे.  गेल्या दोन दिवसापासून ज्येष्ठ नेते शरद पवार हे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील संख या गावी पवार यांनी स्व.बसवराज पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. तर कोल्हापूरमध्येही त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. मात्र शनिवारी त्यांना खोकल्याचा त्रास होत असल्याने बोलताना अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे डॉक्टरांनी शरद पवार यांना चार दिवसांची सक्तीची विश्रांती सुचवली आहे. शरद पवार यांचे नियोजित कार्यक्रम रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी होणारा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.