सोलापूरात रविवारी डोहर समाजाचा राष्ट्रीय मेळावा; बहुजनांच्या जीवावर उठलेल्या सरकारी धोरणाविरोधात भूमिका घेणार

सोलापूर :- बदलते शैक्षणिक धोरण, अनुसूचित जातीतील आरक्षण वर्गीकरण आणि खाजगीकरणामुळे निर्माण झालेल्या अन्यायकारक परिस्थितीला वाचा फोडण्यासाठी ढोर समाजाचा देशव्यापी भव्य मेळावा रविवारी २९ जून २०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सोलापुरात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार असून, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार विठ्ठल कटकधोंड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले तसेच देशभरातील ढोर समाजाचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती सुधीर खरटमल यांनी पत्रकार परिषदेत दिली. ढोर समाजाची व्यथा सरकारपुढे मांडणार ढोर समाजाने महात्मा बसवेश्वर, संत वीर कक्कय्या महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा अवलंब करत आजवर संघर्षाची वाट चालली आहे. मात्र, नवीन शैक्षणिक पद्धती व आरक्षणातील वर्गीकरणामुळे समाजातील विद्यार्थी आणि तरुणांचे भवितव्य धोक्यात आले आहे, अशी खंत आयोजकांनी व्यक्त केली. कातडी कमावणे हा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या या समाजावर शासनाच्या धोरणांमुळे पुन्हा एकदा मागासलेपणाची तलवार टांगत आहे. याशिवाय, खाजगीकरणामुळे बेरोजगारी वाढत आहे आणि शासनाचे ‘कक्कय्या आर्थिक विकास महामंडळ’ अद्याप कार्यरत न झाल्यामुळे योजनांचा लाभही मिळालेला नाही.
मागण्या आणि आंदोलनाचे संकेत
या मेळाव्यातून पुढील प्रमुख
मागण्या मांडण्यात येणार आहेत:
- अनुसूचित
जातींमध्ये आरक्षणाचे योग्य न्यायाधिष्ठ वर्गीकरण
- ‘कक्कय्या आर्थिक विकास महामंडळ’ त्वरीत सुरू करून निधीची उपलब्धता
- शिक्षण, नोकरी
व उद्योजकतेसाठी समाजाला विशेष धोरण
- खाजगीकरणामुळे
निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चा
नेते, अधिकारी आणि समाजबांधवांचे आवाहन
या मेळाव्यासाठी महाराष्ट्रासह अन्य
राज्यांतील ढोर समाजाचे नेते, पदाधिकारी व
कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यावेळी समाजाच्या अडचणींवर चर्चा
करून आंदोलनाची रणनीती ठरवली जाणार आहे.
पत्रकार परिषदेला उपस्थित:
- लक्ष्मीदास
सोनकवडे (निवृत्त मुख्य अभियंता,
महावितरण)
- सच्चिदानंद
व्हटकर (निवृत्त अधिकारी,
सोमपा)
- संगीता
जोगधनकर
- शारदा
शिंदे
सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने
उपस्थित राहावे, असे आवाहन
आयोजकांकडून करण्यात आले आहे.