संगमेश्वर काॅलेजमध्ये १० फेब्रुवारीस राष्ट्रीय परिषद

सोलापूर: श्री संगमेश्वर
एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) सोलापूर मधील गणित विभाग व
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त
विद्यमाने सोमवार दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजता या
वेळेत गणित विषयातील नवीन ट्रेंड (एन.सी.आर.टी.एम. -२०२५) या विषयावर राष्ट्रीय
परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर सोलापूर विद्यापीठातील नाविन्यता केंद्राचे संचालक डॉ. व्ही.बी. पाटील
यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संगमेश्वर एज्युकेशन
सोसायटीचे चेअरमन मा. धर्मराज काडादी असतील. या परिषदेमध्ये सावित्रीबाई पुणे विद्यापीठातील
गणित विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. एम.एम. शिखारे हे बीजभाषण करणार आहेत. तर
हैद्राबाद विद्यापीठातील डॉ . सचिन बल्लाळ, जेएसपीएम विद्यापीठ पुणे येथील
डॉ. एम.जी. श्रीगन हे मान्यवर सत्रात विचार मांडणी करतील. तसेच एका सत्रात नवे
संशोधक आपले शोधनिबंध सादर करणार आहेत. समारोपाच्या सत्रासाठी प्रमुख पाहुणे
म्हणून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विज्ञान शाखेचे
प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार हे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेचा मुख्य उद्देश म्हणजे अभ्यासकांना
गणित विषयांवर प्रसिद्ध तज्ञांच्या व्याख्यानांचा लाभ करून देणे, त्यांच्याशी संवाद साधणे यासाठी
एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. ही
परिषद तरुण संशोधकांना गणितातील अलीकडील नव्या बदलांचा आढावा घेण्यासाठी उपयुक्त
ठरेल. तरी या क्षेत्रात पाऊल ठेवू इच्छिणाऱ्या गणितज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी या
परिषदेचा लाभ सर्वांनी घ्यावा. असे आवाहन कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. ऋतुराज
बुवा, समन्वयक डॉ. ए.एस. ढोणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी
सह-समन्वयक डॉ. सुहास गाडे (९९६०३८३७३६ ) यांच्याशी संपर्क साधावा.