नासाच्या दिग्गज अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची २७ वर्षांच्या ऐतिहासिक सेवेनंतर निवृत्ती

नासाच्या इतिहासातील सर्वात अनुभवी आणि यशस्वी अंतराळवीरांपैकी एक असलेल्या सुनीता विल्यम्स यांनी २७ डिसेंबर २०२५ पासून अधिकृतपणे निवृत्ती स्वीकारली आहे. तब्बल २७ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी मानवी अंतराळ उड्डाण क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित करत नासाच्या इतिहासात अढळ स्थान निर्माण केले. नासाच्या माहितीनुसार, सुनीता विल्यम्स यांनी एकूण ६०८ दिवस अंतराळात घालवले असून, हा कोणत्याही नासा अंतराळवीराचा दुसरा सर्वाधिक कालावधी आहे. त्यांनी नऊ वेळा अंतराळयात्रा (Spacewalks) केल्या असून, एकूण ६२ तास ६ मिनिटे अवकाशात काम केले. ही कामगिरी महिला अंतराळवीरांमध्ये सर्वोच्च असून, एकूण चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच अवकाशात मॅरेथॉन धावणारी पहिली व्यक्ती म्हणूनही त्यांचा इतिहासात उल्लेख केला जातो. नासाकडून गौरव नासाचे प्रशासक जेरेड इसाकमन यांनी सुनीता विल्यम्स यांच्या योगदानाचे विशेष कौतुक करताना सांगितले की, सुनीता विल्यम्स या मानवी अंतराळ उड्डाणाच्या प्रणेत्या आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील त्यांच्या नेतृत्वामुळे भविष्यातील चंद्र आणि मंगळ मोहिमांचा मजबूत पाया रचला गेला.” २००६ पासून ऐतिहासिक प्रवास सुनीता विल्यम्स यांनी डिसेंबर २००६ मध्ये स्पेस शटल डिस्कव्हरी मधून पहिला अंतराळ प्रवास केला. त्यानंतर २०१२ मध्ये, कझाकस्तानमधील बायकोनूर कॉस्मोड्रोम येथून उड्डाण करत त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळली. अलीकडेच, जून २०२४ मध्ये त्यांनी बोईंग स्टारलाइनर मोहिमेतून अंतराळ प्रवास केला आणि मार्च २०२५ मध्ये पृथ्वीवर यशस्वी परतल्या. पिढ्यांसाठी प्रेरणा नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरच्या संचालक व्हेनेसा वायचे म्हणाल्या की, सुनीता विल्यम्स यांची कारकीर्द नेतृत्व, धैर्य आणि समर्पणाचे प्रतीक आहे. त्या येणाऱ्या पिढ्यांतील अंतराळवीरांसाठी कायम प्रेरणास्थान राहतील.” निवृत्तीनंतर प्रतिक्रिया देताना सुनीता विल्यम्स म्हणाल्या की, अंतराळ हे माझे सर्वात आवडते ठिकाण आहे. नासामधील माझा काळ हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान होता.”
तसेच त्यांनी आशा व्यक्त केली की, त्यांच्या कार्यामुळे आर्टेमिस मोहिमेद्वारे चंद्र आणि भविष्यात मंगळावरील मानव मोहिमांचा मार्ग मोकळा होईल.