नळदुर्गच्या आपलं घर बालगृहातील १०४ विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट व टी शर्ट भेट

अक्कलकोट: येथील एम.बी.पसारे क्लासेस च्या संचालिका मल्लम्मा पसारे यांनी आपला ७२ वा वाढदिवस नळदुर्ग येथील आपलं घर बालगृह या ठिकाणी आगळ्यावेगळ्या आणि साध्या पद्धतीने साजरा केला. बालगृहातील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे व आपल्याला समाजाचे काही देणे आहे, या उदात्त भावनेतून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे पसारे यांच्याकडून वाढदिवसानिमित्त बालगृहातील सुमारे १०४ विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट व टी शर्ट भेट देऊन आनंद व्दिगुणित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते पसारे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.तसेच यावेळी शाळेतील 10 सेवेकरी, पर्यवेक्षक, काळजीवाहक, स्वयंपाकी वाचमन, ड्रायव्हर यांचा देखील शाल, श्रीफळ, नॅपकिन बुके देऊन सत्कार करण्यात आला. प्रत्येकाचे समाजाचे काही तरी देणे लागते. समाजऋण समाजाची सेवा करून फेडता येते. याच भावनेतून आपलं घर बालगृह स्थापन करून समाजातील वंचित, शोषित,अनाथ मुलांसाठी निवासी शाळेचे सुरुवात करण्यात आल्याची माहिती सुराणा यांनी दिली . जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे या भावनेतून दरवर्षी आपला वाढदिवस समाजातील अनाथ, पिडीत, वंचित मुलांना त्यांची शैक्षणिक गरज पाहून शैक्षणिक साहित्य, गणवेश देऊन अनोख्या पद्धतीने पसारे आपला वाढदिवस गेली अनेक वर्षे साजरा करत असल्याचे शांतप्पा कलबुर्गी यांनी सांगितले. या कार्यक्रमास एम. बी. पसारे यांचे कुटुंबीय धर्मण्णा तुप्पद्द, जगदेवी तुप्पद, सावित्री पसारे,जनकल्याण बचत गटाचे सदस्य समाजसेवक सुभाष पुजारी, शांतप्पा कलबुर्गी, संतोष वगाले, नितीन उपरे, सोलापूर जनता बँकेचे सायबण्णा सोनकांबळे, महादेव बिराजदार,सिद्धारम धुत्तरगी, समर्थ वगाले, आपलं घरं बालगृह चे अधीक्षक संदीप चवले, विदयार्थी, शिक्षक, सेवेकरी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.