नागपूरमध्ये प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या; शहरात खळबळ

नागपूर  १५ एप्रिल २०२५ :- शहरातील प्रसिद्ध ‘सोशा रेस्टॉरंट’चे मालक आणि उदयोन्मुख व्यावसायिक अविनाश भुसारी (वय २) यांची सोमवारी मध्यरात्री गोळ्या घालून हत्या झाल्याने नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामनगर मार्गावरील सोशा कॅफेजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास भुसारी यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हल्ल्यामागे टोळी युद्धाचा संशय व्यक्त करण्यात येत असून, हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच संभाव्य आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. अविनाश भुसारी हे नागपूरमधील तरुण व्यावसायिकांपैकी एक होते. त्यांचे ‘सोशा कॅफे’ हे रेस्टॉरंट युवकांमध्ये विशेष लोकप्रिय होते. त्यांच्या मृत्यूने शहरातील व्यावसायिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.