आजपासून कुडूच्या नागनाथ यात्रेस प्रारंभ

कुई, दि. २३ - कुडू गावातील ग्रामदैवत नागनाथ महाराजांची वार्षिक पाचदिवसीय यात्रा सोमवार, २४ मार्चपासून सुरू झाली असून ती शुक्रवार, २८ मार्चपर्यंत चालणार आहे. नागनाथ यात्रा समितीच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी पहाटे नागनाथ महाराजांची महापूजा पार पडली. यानंतर रात्री रथोत्सवाची भव्य ग्रामफेरी काढण्यात आली. या फेरीत बँड पथके, ढोलीबाजा, सोंगाची पात्रे, सनई, तुतारी, हलगी पथके यांचा समावेश होता. गावभर विद्युत रोषणाई करण्यात आली असून आकाश पाळणा, ब्रेक डान्स पाळणा, गंमतीशीर खेळ आणि शोभेचे दारूकामही पाहायला मिळणार आहे. मंगळवारी के. धोंडिबा ढाणे आखाड्यात बालमल्ल ते राष्ट्रीय स्तरावरील मल्लांच्या कुस्त्या रंगणार आहेत. या कुस्त्यांसाठी राज्यातील नामवंत मल्ल, वस्ताद आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. बुधवारी, २६ मार्च रोजी क्रांतिनाना माळेगावकर यांचा 'क्षण आनंदाचा खेळ पैठणीचा, सन्मान नारी शक्तीचा' हा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी ७ वाजता आंतरभारती विद्यालयात होईल. गुरुवारी, २७ मार्च रोजी लावणी रसिकांसाठी लावणीसम्राज्ञी हिंदवी पाटील यांचा 'हिऱ्याची हिरकणी' हा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता आंतरभारती विद्यालयात रंगणार आहे. शुक्रवारी, मार्च रोजी भव्य खुली बैलगाडा शर्यत कुडूवाडी रस्त्यावर दत्त दरबार मंदिरासमोर सकाळी ९ वाजता होणार आहे. प्रथम क्रमांकासाठी १ लाख ५५ हजार रुपये रोख बक्षीस ठेवण्यात आले आहे. स्पर्धकांना १५०० रुपये प्रवेश फी भरणे आवश्यक आहे. इच्छुक स्पर्धकांनी वस्ताद अण्णासाहेब ढाणे (७७७६०१२७७६) किंवा माजी सरपंच बाबाराजे जगताप (७०३५५४५५५) यांच्याशी संपर्क साधावा.