सुट्टीसाठी हत्या? धार्मिक संस्थेत चिमुकल्याची नृशंस हत्या

कोल्हापूर:- हातकणंगले तालुक्यातील आळते गावातील एका धार्मिक शिक्षण संस्थेत रविवारी (१५ जून) रात्री घडलेल्या एका भयावह घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. ११ वर्षीय फैजान नाजिम या विद्यार्थ्याची झोपेत असताना हत्या करण्यात आली. ही हत्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून आणि इलेक्ट्रिक वायरने शॉक देऊन करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे, संस्था बंद पडावी आणि सुट्टी मिळावी यासाठीच एका अल्पवयीन विद्यार्थ्याने हे क्रूर कृत्य केल्याची कबुली दिली आहे. फैजानचा दुर्दैवी अंत बिहारमधील रहिवासी असलेला फैजान नाजिम हा या धार्मिक संस्थेत शिक्षण घेत होता. रविवारच्या रात्री झोपेत असतानाच त्याच्या तोंडात कपडा कोंबण्यात आला आणि नंतर शॉक देण्यात आले. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांकडून तातडीची कारवाई घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला. संस्थेतील एका अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याने खळबळजनक कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याला बाल निरीक्षणगृहात पाठवले आहे. दुर्लक्षित मानसिकता आणि शाळांची सुरक्षा यांच्यावर प्रश्नचिन्ह या घटनेमुळे धार्मिक शिक्षण संस्था किंवा वसतिगृहातील सुरक्षाव्यवस्था आणि विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था या दोन्हींवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. संस्थेला सुट्टी मिळावी म्हणून खून करणे ही मानसिकता अतिशय धोकादायक आहे, असे सामाजिक कार्यकर्ते आणि पालकवर्ग म्हणत आहेत. पोलिस तपास सुरू पोलिसांच्या प्राथमिक तपासात असेही आढळले आहे की, या हत्येचा कट काही दिवसांपूर्वीच रचण्यात आला असावा. इतर दोन विद्यार्थ्यांचीही चौकशी सुरू असून, अजून कोणी सहभागी होते का, याची सखोल तपासणी केली जात आहे.