मुनगंटीवार नाराजच, भाजपच्या सत्काराला दांडी

मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर माजीमंत्री सुधीर मुनगंटीवर नाराज नाहीत, असे सांगत आहेत. भाजपच्यावतीनेही ते नाराज नसल्याचा दावा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना मोठे पद देणार असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. त्यानंतरही त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही हे पुन्हा उघड झाले आहे.

भाजपच्यावतीने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील चार मंत्री तसेच निवडून आलेल्या भाजपच्या सर्व आमदारांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे मुनगंटीवर या कार्यक्रमाला येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. भाजपचे कार्यकर्तेसुद्धा त्यांची प्रतीक्षा करीत होते. मात्र, शेवटपर्यंत ते आलेच नाहीत. यावरून मुनगंटीवार यांनी नाराजी कायम असल्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

सुधीर मुनगंटीवार राज्यात अर्थमंत्री, वन मंत्री तसेच सांस्कृतिक खात्याचे यापूर्वी मंत्री होते. देवेंद्र फडणवीस यांच्या यापूर्वीच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनीच राज्याचा अर्थसंकल्प मांडला होता. ते भाजपचे प्रदेशाध्यक्षसुद्धा राहिले आहेत. अडीच वर्षांच्या महायुतीच्या कार्यकाळातही ते वनमंत्री व सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते. महायुतीची पुन्हा सत्ता आल्यानंतर पहिल्या यादीतच सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश राहील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना ज्यांचे मंत्रिमंडळाच्या यादीत नावे आहेत त्यांना फोनवरून कळवण्यात आले. यात मुनगंटीवार यांचा समावेश नव्हता. त्यामुळे त्यांनी अधिवेशनात जाणेसुद्धा टाळले होते. त्यानंतर त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचीसुद्धा भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले होते. माझे नाव मंत्रिमंडळाच्या यादीत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीसुद्धा माझे नाव असल्याचे सांगितले होते, असा दावा त्यांनी केला होता. मात्र, माझे नाव कुठल्या पेनच्या शाईने लिहिले होते जे आपोआप मिटले हे कळायला मार्ग नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी मारला होता. 'वक्त आयोग वक्त जायेगा' असे सांगून त्यांनी आपण आशावादी असल्याचे सांगितले होते. या सर्व घटनाक्रमानंतर त्यांची नाराजी दूर झाल्याचे मानले जात होते. मात्र, आज पक्षातर्फे आयोजित केलेल्या सत्कार समारंभाला दांडी मारून त्यांनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी दर्शवली असल्याचे बोलले जात आहे.