मुंबईकरांनो सावधान! उद्या सकाळपर्यंत पावसाचा 'रेड अलर्ट'

मुंबई :- ठाणे, नवी मुंबई या मुंबई महानगर क्षेत्राला सोमवारी पावसाने झोडपले. सकाळी ६ ते ७ या एक तासात मुसळधार पाऊस पडल्यान मुंबई लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली. वडाळा आणि सीएसएमटी दरम्‍यानची हार्बर मार्गावरील रेल्‍वे वाहतूक सकाळी १०.२५ पासून ठप्प झाली आहे. हार्बर मार्गावर मस्जिद बंदर आणि करी रोड रेल्वे परिसरात ट्रॅकवर पाणी साचल्याने CSMT कडे जाणारी लोकल सेवा थांबवण्यात आली आहे. मुंबईत सोमवारी सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नरिमन पॉईंट परिसरात तब्बल ४० मिनी पावसाची नोंद झाली आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच शहरासह मीरा-भाईंदर, वसई विरार, पालघर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल व अन्य भागातून दक्षिण मुंबई कामानिमित्त आलेले चाकरमानी भिजून गेले. पावसाचा वेग इतका होता की छत्री असूनही अनेक जण भिजून गेले. सकाळी सात वाजल्यानंतर पावसाचा जोर थोडा ओसरला. परंतु अधून मधून पडणाऱ्या पावसाच्या मोठ्या सरींमुळे दक्षिण मुंबईच्या काही सकल भागात पाणी तुंबले होते. परंतु या पाण्याचा पालिकेने तातडीने निचरा केला. पूर्व पश्चिम उपनगरातही तुरळक पाऊस पडत आहे. पावसामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला. लोकल ट्रेनची वाहतूक उशिराने सुरू आहे. तर मुंबईकडे येणाऱ्या महामार्गांवरही वाहनांच्या रांगा लागल्या आहे. तर मुंबई विमानतळावरील विमानांचे आगमन आणि प्रस्थानही उशिराने सुरू असल्याचे समजते. स्पाईस जेटने प्रवाशांना विमान सेवेत विलंब होण्याची शक्यता आहे, अशा आशयाचे मेसेज प्रवाशांना पाठवले आहेत.

 

६ ते ७ पडलेला पाऊस

नरिमन पॉईंट - ४० मिमी

ग्रँटरोड - ३६ मिमी

मेमनवाडा - ३५ मिमी

चंदनवाडी - ३५ मिमी

कुलाबा - ३१ मिमी

डोंगरी - ३० मिमी

मांडवी - २४ मिमी

भायखळा - १८ मिमी

मुंबई सेंट्रल - १४ मिमी

आज समुद्राला मोठी भरती

दुपारी - ११.२४ वाजता

रात्री ११.०९ वाजता

समुद्रात ४.७५ व ४.१७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार

रविवार सकाळी ८ ते सोमवार सकाळी ८ पर्यंत पडलेला पाऊस

शहर - ५८ मिमी

पूर्व उपनगर - १९ मिमी

पश्चिम उपनगर - १५ मिमी