मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाला पुन्हा एकदा मुदतवाढ; आता डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पाला चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) अधिकारी म्हणतात, प्रकल्पावरील व्हर्टिकल ब्रिजचे काम अत्यंत तांत्रिक आणि कठीण असल्यामुळे आता हा प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल. सप्टेंबर नव्हे, आता डिसेंबर डेडलाईन 30 मे रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएसआरडीसीच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांनी मिसिंग लिंक प्रकल्पाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लोणावळा परिसरातील हवामान आणि अवघड भूप्रदेशामुळे व्हर्टिकल ब्रिजचे काम नियोजनबद्धरीत्या करता येणे गरजेचे आहे. पावसाळ्यात काम करणे शक्य नसल्याने अंतिम डेडलाईन आता डिसेंबर 2025 करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी चार वेळा मुदतवाढ मिसिंग लिंक प्रकल्पासाठी सुरुवातीला मार्च 2024 ची डेडलाईन होती. त्यानंतर ती जानेवारी 2025, मग मार्च 2025, आणि एप्रिलमध्ये सप्टेंबर 2025 अशी चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. 6,600 कोटींचा प्रकल्प; वेळ आणि अंतर दोन्ही वाचणार या प्रकल्पासाठी सुमारे ₹6,600 कोटींचा खर्च झाला असून, त्यामुळे मुंबई-पुणे अंतर 6 किमीने कमी होणार आहे. सध्याचे 19 किमीचे अंतर 13.3 किमीवर येणार आहे, आणि प्रवासाचा 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. वाहतूक कोंडी व दरड कोसळण्यावर उपाय बोरघाट परिसरातील वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यातील दरड कोसळण्याच्या घटनांवर उपाय म्हणून हा प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ, इंधन आणि अपघातांचा धोका कमी होणार आहे.

प्रकल्पात काय विशेष?

  • दोन बोगदे: 1.6 किमी आणि 8.9 किमी
  • 180 मीटर उंचीचा पूल: एक्सप्रेसवेवरील सर्वात उंच पूल
  • सर्वात रुंद बोगदा: वाहतुकीसाठी सोयीचा मार्ग
  • मार्ग: खालापूर ते खोपोली इंटरचेंज आणि खोपोली एक्झिट ते कुसगाव (सिंहगड संस्था)