कुणाल कामराला पुन्हा मुंबई पोलिसांचं समन्स, वाढीव मुदतीची विनंती फेटाळली

मुंबई, दि. २५ मार्च -
हास्य कलाकार कुणाल कामरा यांच्या वादग्रस्त कॉमेडी शोनंतर निर्माण झालेला वाद चांगलाच पेटला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणाऱ्या गाण्यावरून त्यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कामराला पहिले समन्स बजावल्यानंतरही तो चौकशीसाठी हजर राहिला नाही.

त्यानंतर मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा समन्स बजावले असून, यावेळी मुदतवाढीची विनंती फेटाळली आहे. त्यामुळे कामराच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रकरण काय आहे?
कुणाल कामराने उपमुख्यमंत्र्यांचा थेट उल्लेख न करता त्यांना गद्दार’ म्हणत गाणे सादर केले होते. यानंतर मोठा वाद निर्माण झाला. या शोदरम्यान उपस्थित असलेल्या काही प्रेक्षकांनी स्टुडिओची तोडफोड केल्याचीही माहिती आहे.

कामराने वकिलामार्फत चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ वाढवून मागितली होती. मात्र, पोलिसांनी ही मागणी फेटाळली. याशिवाय, शोशी संबंधित इतर स्टुडिओ कर्मचाऱ्यांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.

कायदेशीर कारवाई:
कुणाल कामरावर कलम ३५३ (१) ब, ३५३ (२) आणि ३५६ (२) अंतर्गत बदनामी व इतर आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुरुवातीला एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर हा गुन्हा झीरो एफआयआर स्वरूपात खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.