अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरेंना मोठा धक्का; मनसेच्या ११ पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज माघारी
घेण्याचा शेवटचा दिवस असून, शहरात सर्वच राजकीय पक्षांमध्ये
बंडखोरीचे चित्र पाहायला मिळत आहे. पक्षांकडून बंडखोरांना थांबवण्यासाठी जोरदार
प्रयत्न सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे
तब्बल ११ पदाधिकारी पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. मुंबई महापालिकेसाठी राज
ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती झाली असून या युतीत मनसेला ५३ जागा देण्यात
आल्या आहेत. दीर्घ वाटाघाटीनंतर जागावाटप अंतिम झाले होते. मात्र, अर्ज माघारीच्या निर्णायक टप्प्यावरच मनसेतील अंतर्गत नाराजी समोर आली
आहे.
आज मुंबईतील प्रभाग क्रमांक ९७ आणि ९८ मधील मनसेच्या ११
पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व पदाधिकारी
मनसेच्या स्थापनेपासून पक्षासोबत कार्यरत होते.
नेमकं कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मशाल चिन्हावर
उमेदवारी देण्यात आल्याने मनसेतील अनेक पदाधिकारी नाराज होते. पक्षाने दिलेल्या
उमेदवारीला स्थानिक पातळीवर तीव्र विरोध होता. या नाराज पदाधिकाऱ्यांना भाजपने
आपल्या गळाला लावण्यात यश मिळवले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीत या
सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. विशेषतः वॉर्ड क्रमांक ९७
मध्ये मनसेला हा मोठा फटका बसला आहे. निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना
जुन्या सहकाऱ्यांनी साथ सोडल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली
जात आहे.
दरम्यान, भाजपकडून वॉर्ड क्रमांक ९७ मधून हेतल
गाला निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर बाळा चव्हाण मशाल
चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. प्रभाग क्रमांक ९८ मधून दीप्ती काते यांना मनसेकडून
तिकीट देण्यात आले असून त्यांच्या उमेदवारीला मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्याचेही
समोर आले आहे.