मुंबई महापालिका निवडणुकीत रिपाइंची एंट्री; भाजप–शिंदे सेनेकडून प्रत्येकी ६ जागा सोडण्याचा निर्णय
मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक आता अधिकच रंगतदार होत चालली
आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील २० जागांवरील तिढा सुटत असतानाच
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं)
ने मैदानात उतरण्याची घोषणा केल्याने राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. मुंबई
महापालिका निवडणुकीसाठी रिपाइं ३९ उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा रामदास आठवले
यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे सेनेने मोठा निर्णय घेतला असून, रिपाइंसाठी प्रत्येकी सहा-सहा जागा सोडण्यावर दोन्ही पक्ष तयार झाले आहेत.
रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांची भेट घेतल्यानंतर या निर्णयाबाबत स्पष्टता आली आहे. सुरुवातीला भाजपला १३७
आणि शिंदे सेनेला ९० जागा असे जागावाटप ठरले होते. मात्र रिपाइंला सामावून
घेतल्यामुळे या समीकरणात बदल होणार आहे. नव्या गणितानुसार भाजप १३१, शिंदे यांची शिवसेना ८४ आणि रिपाइं १२ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची
माहिती आहे. उर्वरित जागांवर रिपाइं स्वबळावर उमेदवार उभे करणार आहेत. मुंबई
महापालिकेसाठी भाजप–शिवसेना युती करताना रिपाइंला सुरुवातीला विचारात न
घेतल्यामुळे रामदास आठवले नाराज होते. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि
उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. या बैठकीतच दोन्ही पक्षांनी
प्रत्येकी सहा जागा सोडण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. दरम्यान, अंतिम जागावाटपावर उद्यापर्यंत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून,
या निर्णयामुळे मुंबई महापालिका निवडणुकीतील राजकीय चित्र अधिकच
उत्सुकतेचे बनले आहे.