मुंबई महापौरपदावर चुरस: उद्धव ठाकरेंचे सूचक विधान; “देवाच्या मनात असेल तर मुंबईत आपलाच महापौर बसेल”
अटीतटीच्या झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर आता
शहराच्या महापौरपदावर कोण विराजमान होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीला काठावरचे बहुमत मिळाले असले, तरी विरोधी पक्षातील ठाकरे बंधूंची युती, काँग्रेस
आणि इतर पक्षांची संख्या देखील बहुमताच्या आसपास पोहोचत असल्याने महापौरपदासाठी
मोठी चुरस निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौरपदाबाबत सूचक विधान करत राजकीय वातावरण तापवले
आहे. “मुंबईत आपला महापौर बसावा, ही
इच्छा आहेच. देवाच्या मनात असेल तर तेही होईल,” असे उद्धव
ठाकरे म्हणाले.
मातोश्रीवर विजयी नगरसेवकांची भेट
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या
उद्धवसेनेच्या नगरसेवकांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले. त्यांच्या या
वक्तव्यानंतर सभागृहात उपस्थित शिवसैनिकांनी टाळ्यांच्या गजरात जल्लोष केला.
निकालांनंतरचे राजकीय गणित
मुंबई महापालिकेच्या निकालांनुसार,
- भाजपा–शिंदेसेना
महायुतीला एकूण ११८ जागा मिळाल्या आहेत.
- भाजप: ८९
- शिंदेसेना: २९
- ठाकरे बंधूंच्या
युतीला ७२ जागा मिळाल्या आहेत.
- उद्धवसेना: ६५
- मनसे: ६
- राष्ट्रवादी
काँग्रेस (शरद पवार): १
- काँग्रेसला २४ जागा,
- एमआयएमला ८,
- राष्ट्रवादी
काँग्रेस (अजित पवार) गटाला ३,
- उर्वरित जागा इतर
पक्षांना मिळाल्या आहेत.
या आकड्यांमुळे कोणत्याही एका आघाडीला स्पष्ट वर्चस्व
नसल्याने महापौरपदाची निवड अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
महापौरपदावर वाढली उत्सुकता
उद्धव ठाकरे यांच्या सूचक विधानामुळे महापौरपदासाठी
संभाव्य राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. आगामी काळात कोणते पक्ष एकत्र
येतात आणि सत्ता स्थापनेसाठी कोणती गणिते जुळतात, यावर मुंबईचा पुढील कारभार अवलंबून असणार
आहे.