सत्कार सोहळ्याला आमदारांसह खासदारांची पाठ

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले अन् राम शिंदे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आला. कारण शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतिपदी निवड झाली. त्यांचा सर्वपक्षीय सन्मान सोहळा नगर शहरात आयोजित करण्यात आला. मात्र, या सोहळ्याला अक्षरशः बारा आमदारांपैकी केवळ एका आमदाराने उपस्थिती दर्शवली. धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही खासदाराने कार्यक्रमाकडे पाठ फिरवली, यामुळे या कार्यक्रमाची एकच राजकीय चर्चा जिल्ह्यात सुरू झाली. केवळ आघाडीच्या एका आमदाराने हजेरी लावली, तर महायुतीच्या एकही आमदार या कार्यक्रमाकडे फिरकला नाही. विधानपरिषदेच्या सभापतिपदी राम शिंदे यांची निवड झाली. यानिमित्ताने शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भाजपने पुढाकार घेतला. सर्व लोकप्रतिनिधींना आमंत्रण देखील पाठवण्यात आले, तसेच खासदारांना देखील आमंत्रण पाठवले. पदाधिकाऱ्यांकडून फोन देखील करण्यात आले. कोणत्याही एका पक्षाचा कार्यक्रम नसून सर्वपक्षीय कार्यक्रम असल्याने लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. मात्र, याउलट चित्र सभागृहात पाहायला मिळाले. शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला नगर जिल्ह्यातील बारा आमदारांपैकी केवळ श्रीरामपूर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत ओगले हे उपस्थित होते. तर राधाकृष्ण विखे, विठ्ठलराव लंघे, शिवाजीराव कार्डिले, मोनिका राजळे हे अनुपस्थित होते. विशेष म्हणजे नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला चक्क नगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे देखील हजर नव्हते. तसेच दोन्ही खासदार यांनी देखील या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. विशेष म्हणजे खासदार नीलेश लंके आणि राम शिंदे यांची घनिष्ठ मैत्री असताना लंके यांनी देखील सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती दर्शवली. शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार सत्यजित तांबे हे उपस्थित होते. मात्र, या सोहळ्याला महायुतीच्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. मात्र, आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी हजेरी लावली. यामुळे मंचावर केवळ आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा बोलबाला दिसून आला.

नगर जिल्ह्याला सभापतिपदाचा मान हा चार वेळेला मिळालेला आहे, त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने सत्कार व्हावा, अशी भावना प्रत्येकाची होती. त्यादृष्टिकोनातून नियोजन करण्यात आले होते. दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यामुळे हा कार्यक्रम पुढे घेण्याचा निर्णय झाला. अलीकडे तो नगर येथे होणार होता, यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन करण्यात आलेले होते.