लग्न घरात शोककळा; एकाच कुटुंबातील ५ जणांना ट्रकने चिरडले

भोपाळ: बहिणीच्या घरी लग्न समारंभासाठी आलेल्या एका कुटुंबाला
भरधाव ट्रकने चिरडले. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी आहेत. मध्य
प्रदेशातील भिंड येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली. भिंड जिल्हाधिकारी
कार्यालयातील कर्मचारी हे त्यांच्या
कुटुंबासह जवाहरपुरा येथे त्यांच्या बहिणीच्या घरी लग्न कार्यासाठी गेले होते.
सकाळी त्याच्या कुटुंबातील काही सदस्य भिंड शहरातील भवानीपुरा येथील त्यांच्या घरी
परतण्याची तयारी करत होते. भात समारंभानंतर घरी परतणाऱ्या लोकांना रस्त्यावरून
जाणाऱ्या मालवाहू गाडीत बसवण्यात येत होते. त्याच्या मागे दुचाकीवर कुटुंबातील तीन
सदस्यही उभे होते. त्याचवेळी एका भरधाव ट्रकने गाडीला धडक दिली. या अपघातात ३
जणांचा जागीच मृत्यू झाला तर सुमारे १३ जण जखमी झाले. भिंड जिल्हाधिकाऱ्यांनी
सांगितले आहे की, जखमींना तात्काळ १०८ रुग्णवाहिकेद्वारे
भिंड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी आणखी दोन जणांना मृत घोषित
केले. या घटनेने लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आलेल्या कुटुंबावर शोककळा पसरली.
५ जणांचा मृत्यू आणि १३ जण जखमी झाल्यानंतर, मृतांच्या
कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी संतापाने रस्ता रोखला.