माउंट एटना ज्वालामुखी पुन्हा सक्रीय; स्फोटामुळे पर्यटक घाबरले

सिसिली, इटली – जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुख्यांपैकी एक असलेल्या माउंट एटना येथे अचानक मोठा उद्रेक झाला. या शक्तिशाली स्फोटामुळे उष्ण वायू, राख, खडक आणि लावा काही किलोमीटर उंच हवेत फेकले गेले. स्फोटावेळी तेथे उपस्थित असलेल्या अनेक पर्यटकांनी जीव मुठीत घेऊन पळ काढला, असे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गो एटना येथील मार्गदर्शक ज्युसेप्पे पॅनफॅलो यांनी आपल्या टूर ग्रुपचा व्हिडिओ शेअर केला, ज्यात लोक स्फोटस्थळापासून लांब जाताना दिसत आहेत. “आम्ही अवघ्या दोन पावलं दूर होतो, आणि सुदैवाने आमच्यासोबत जबाबदार गाइड होता,” असे त्यांनी सांगितले. सिसिलियन नागरी संरक्षण एजन्सीनुसार, ज्वालामुखीवर दररोज सुमारे डझनभर टूर ऑपरेटर काम करतात. उद्रेकाच्या वेळी सर्व ट्रेकर्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, अशी माहिती राष्ट्रीय भूभौतिकशास्त्र व ज्वालामुखी वेधशाळेने दिली आहे. स्फोटानंतर तीनही लावा प्रवाह सक्रिय झाले होते, मात्र ते सध्या थंड होत चालले आहेत. वेधशाळेच्या माहितीनुसार, राखेचे तुरळक स्फोट, कमी प्रमाणातील भूकंपाचे झटके आणि आंशिक शिखर कोसळणे ही लक्षणे आढळून आली आहेत. या स्फोटात पायरोक्लास्टिक प्रवाह तयार झाला असून, त्यात उच्च तापमानाचा धूर, लावा आणि खडकांचे तुकडे प्राणघातक वेगाने उतारावरून खाली आले. इटालियन बेटावरील माउंट एटना हे लोकप्रिय पर्यटन स्थळ असून दरवर्षी 1.5 दशलक्ष पर्यटक येथे भेट देतात. २०१४ नंतर पहिल्यांदाच इतक्या तीव्रतेचा उद्रेक झाल्याचे वेधशाळेने नमूद केले आहे. सिसिलियन प्रदेशाचे अध्यक्ष रेनाटो शिफानी यांनी सांगितले की, “सध्या लोकसंख्येस कोणताही धोका नाही,” परंतु त्यांनी गिर्यारोहकांना शिखरावर जाणे टाळण्याचे आणि खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. ताओर्मिना आणि कॅटानियासारख्या ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरांपर्यंतही स्फोटांचे आवाज ऐकू आले, असे स्थानिकांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार हा एक “अचानक आणि शक्तिशाली स्फोटहोता. स्थानिक वेळेनुसार दुपारी १ वाजता, ज्वालामुखीच्या आग्नेय भागातून गरम लावा वाहू लागला. वेधशाळेने याला पायरोक्लास्टिक उद्रेक म्हणून परिभाषित केले आहे, ज्यात राख, वायू आणि खडकांचे मिश्रण जीवघेण्या वेगाने खाली उतरते. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, आपत्कालीन कर्मचारी, वेधशाळा आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर निरंतर लक्ष ठेवून आहेत.