मोटरसायकलला ट्रकची धडक, अपघातात एक ठार, तीन विद्यार्थीनी जखमी

विजयपूर : तालुक्यातील कुमटगी तांडाचा रहिवासी वेंकू चव्हाण (वय 43) आपल्या दोन मुली आणि शेजारील एका मुलीसह कग्गोड येथील एस.एस.एल.सी. परीक्षा केंद्रावर मोटरसायकलने (के.ऐ.२८एच.एल. ५६०३) जात असताना भीषण अपघातात मृत्यूमुखी पडला. तेलंगणामधून आलेल्या ट्रक (टी.एस.१५ यू. ए. ८०५५) ने दिलेल्या धडकेत चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या दोन मुली ऐश्वर्या चव्हाण, प्रिती चव्हाण आणि शेजारील श्वेता गंभीर जखमी झाल्या. जखमी विद्यार्थिनींना तातडीने विजयपूर शहरातील बीएलडीई संस्थेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पालकमंत्री पाटील यांच्याकडून जखमी विद्यार्थिनींची विचारपूस: जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. एम. बी. पाटील यांनी बीएलडीई रुग्णालयात भेट देऊन जखमी विद्यार्थिनींच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांनी डॉक्टरांकडून माहिती घेतली आणि तिन्ही विद्यार्थिनींवर चांगले उपचार करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, या अपघाताची नोंद विजयपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.