हिमाचलमध्ये मान्सूनचा कहर : मुसळधार पावसाने 74 जणांचा बळी, 700 कोटींचे नुकसान

शिमला : हिमाचल प्रदेशात मान्सूनचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, पावसामुळे पुर, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे राज्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या संकटात आतापर्यंत ७४ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ११५ जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी ४७ जण ढगफुटी, पूर आणि भूस्खलनाशी थेट संबंधित घटनांमध्ये दगावले आहेत. तसेच, २६१ रस्ते बंद झाले असून अनेक पुल वाहून गेले आहेत. सुमारे ५२१ प्राणी आणि पक्षीही मृत्युमुखी पडले, तर १९ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी राज्यात एकूण ७०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. यातील सर्वाधिक नुकसान मंडी जिल्ह्यात झाले असून, तेथे १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मंडीमध्ये १७६ रस्ते बंद आहेत, तर कांगडामध्ये १२०, कुल्लूमध्ये ३९, सिरमौरमध्ये १९, आणि शिमलामध्ये ६ रस्ते बंद आहेत. भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे सेराज (मंडी) परिसरात लष्कराच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने मंडी, कांगडा आणि सिरमौर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच, 8 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. राज्य प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.