७ जूनपूर्वी मान्सून दाखल होणार, पावसाचा जोर वाढणार

मुंबई : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या अवकाळी पावसाने हजेरी लावली असतानाच, ७ जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा नैऋत्य मोसमी वारे (Southwest Monsoon) केरळमध्ये अपेक्षेपेक्षा लवकरच पोहोचणार असून, त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून लवकरच प्रवेश करेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जूनच्या पहिल्या आठवड्यात दक्षिण भारत, महाराष्ट्र, ओडिशा आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम किनारपट्टीवरील भागांत दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये १६ आणि १७ मे रोजी जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या अंदाजामुळे खरीप हंगामासाठी तयारी करत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास जलसाठ्यात वाढ होण्यासह कृषी उत्पादनातही वाढ होण्याची शक्यता आहे.