मोहिते पाटील विरोधक कन्फ्यूज्ड

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधी काम केल्याचा ठपका ठेवून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक करत असले तरी वरिष्ठ पातळीवरून मात्र सबुरीची भूमिका घेतली जात आहे. गेल्या काही दिवसात आमदार मोहिते पाटील अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. याचबरोबर पक्षवाढीसाठीच्या सदस्य नोंदणी मोहिमेतही त्यांनी सहभाग नोंदवून पक्षाकडून शाबासकी मिळवली आहे. यामुळे त्यांच्या विरोधकांमध्ये सध्या कन्फ्यूजन असल्याची स्थिती आहे. भाजप हा शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जातो. या पक्षाने विधानसभा निवडणुकीनंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्ष शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. मोहिते पाटील यांच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार राम सातपुते यांनी सतत मोहिते पाटील यांच्यावर कारवाईची मागणी सुरू ठेवली आहे. राज्यात भाजपप्रणीत महायुतीची सत्ता आली असून  देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आहेत. यानंतर तर मोहिते पाटील विरोधकांनी चांगलीच उचल खात मोहिते पाटील यांच्यावर कारवाईसाठी जोर धरला आहे. एका बाजूला भारतीय जनता पक्षाने आमदार मोहिते पाटील यांना पक्ष शिस्तभंगाची नोटीस दिली असली तरी दुसरीकडे पक्षवाढीसाठी राबविलेल्या सदस्यता नोंदणी अभियानात मोहिते पाटील यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचे अभिनंदन करणारे पत्रही त्यांना दिले आहे. त्यामुळे साहजिकच त्यांना पक्षात विरोध करणार्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांची नियुक्ती झाल्यानंतर सातपुते व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गोरे हे निंबाळकर यांचे मित्र आहेत तर सध्या ते मोहिते पाटील विरोधक म्हणून ओळखले जातात. मात्र यानंतरही भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून संयमाची भूमिका घेतली जात असल्याचे चित्र आहे. सोलापूर जिल्हा हा परंपरागत काँगे्रसी विचारसरणीचा असून येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद  पवार यांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. अशा स्थितीत राज्यात 2014 ला भाजप सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे भाजपचे बस्तान बसविण्यासाठी प्रशांत परिचारकसंजय शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बरोबर घेत येथे समविचारी आघाडी तयार केली. त्यावेळी ही आघाडी मोहिते पाटील यांच्याविरोधात  काम करत होती व यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील नेते सहभागी होत होते. 2019 मध्ये रणजितसिंह मोहिते पाटील हेच भाजपमध्ये आले. यानंतर संजय शिंदे यांनी भाजपपासून फारकत घेतली. मोहिते पाटील यांचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणात झाला व माढ्याची जागा जिंकता आली. 2019 च्या लोकसभा व नंतर विधानसभेला मोहिते पाटील यांनी भाजप सांगेल तसे काम केले. विधानसभेला राम सातपुते यांना माळशिरसमधून आमदार म्हणून निवडून आणले. मात्र त्यानंतर तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व मोहिते पाटील गटात राजकीय संघर्ष सुरू झाला. 2024 ला निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होताच धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीची उमेदवारी घेत निवडणूक लढवत निंबाळकर यांचा पराभव केला. विधानसभेला माढा लोकसभेतील सोलापूर जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात महायुतीला जबर फटका बसला. शरद पवार यांच्या पक्षाचे तीन आमदार विजयी झाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे आमदार असणारे रणजितसिंह मोहिते पाटील हे तटस्थ राहिले. त्यांचे बंधूच भाजप विरोधात निवडणूक रिंगणात होते. तर विधानसभा निवडणुकीतही आमदार मोहिते पाटील यांनी पक्षाचा प्रचार केला नाही. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप व मोहिते पाटील यांच्यात अंतर निर्माण झाले होते. विधानसभेला भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला व देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आहेत. यामुळे आता आमदार मोहिते पाटील यांच्यावर पक्ष कारवाई करेलअसा अंदाज होता. मात्र अद्याप तरी पक्षाने सबुरीची भूमिका स्वीकारल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांच्याबाबत राज्यात सहानुभूतीची लाट निर्माण झाल्याचे चित्र होते. यामुळे लोकसभा व नंतर विधानसभेला त्यांची लोकप्रियता आणखी वाढली व याचा परिणाम शरदचंद्र  पवार राष्ट्रवादी पक्षाला या भागात चांगले यश मिळाले आहे. 2019 ला कोणतीही अट न घालता भाजपमध्ये येऊन लोकसभा व विधानसभेला भाजपला मोठी मदत करून जागा जिंकून देणार्‍या मोहिते पाटील यांनी जिल्हा परिषदेतही भाजपप्रणीत आघाडीसाठी खिंड लढवली होती. लोकसभेला रणजितसिंह निंबाळकर हे उमेदवार नकोअशी त्यांची मागणी होती. मात्रपक्षाने त्यांची मागणी मान्य केली नाही आणि यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पक्षत्याग करून तुतारी हाती घेतली. याचे परिणाम भाजपला लोकसभा व विधानसभेला भोगावे लागले आहेत. यामुळे भाजप आता आमदार मोहिते पाटील यांच्याविरोधात भूमिका घेण्यापूर्वी संयम बाळगत असावाअसा अंदाज आहे. मात्र यात मोहिते पाटील विरोधक कन्फ्यूज्ड असल्याचे जाणवते.        

                                    प्रशांत आराध्ये-  मोबा. 9822516284