रे नगरातील कामगारांना रोजगार उपलब्धीसाठी 250 कोटी देऊ म्हाडाचे उपाध्यक्ष डॉ. जयस्वाल यांची हमी; 21 हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ
.jpeg)
संचार प्रतिनिधी
सोलापूर, दि.19-
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत कुंभारीच्या माळरानावरील रे नगरात साकारत असलेल्या 30 हजार घरकूल प्रकल्पातील असंघटित कामगारांना हक्काच्या घरासोबत त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा कटिबद्ध असून त्यासाठी किमान 250 कोटींचे बीज भांडवल उपलब्ध करून देऊ, अशी हमी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजीव जयस्वाल यांनी दिली.
शनिवारी, रे नगर या महत्त्वाकांक्षी व पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्पाच्या परिसरात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण आणि रे नगर फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वन महोत्सव 2025 च्या माध्यमातून 21 हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ डॉ. जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रे नगर फेडरेशनच्या चेअरमन नलिनी कलबुर्गी या होत्या. यावेळी रे नगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, म्हाडा मुंबईचे मुख्याधिकारी मिलिंद शंभरकर, राहुल साकोरे, वित्त नियंत्रक अजयसिंह पवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निर्हाळी, प्रांताधिकारी सुमित शिंदे, विकासक अंकूर पंधे, माजी नगरसेविका कामिनी आडम, अॅड. एम एच शेख, उद्योजक प्रल्हाद काशीद उपस्थित होते.