दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मनाचा कणखरपणा आधी परीक्षा; मग वडिलांना खांदा

गोंदिया : दहावीची परीक्षा हा जीवनात खूप महत्त्वाचा टप्पा मानला
जातो. अशावेळी आपला आधारवडच हरपणे आणि तेही परीक्षेच्या दिवशीच, हे दु:खदच. मात्र, हे
दु:ख सहन करीत गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील
विद्यार्थ्याने कठीण क्षण पार केला. आदेश ठानेश्वर कटरे याने आपल्या वडिलांचे
स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला. आधी त्याने मराठीचा पेपर दिला, नंतरच पित्याला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. या कठीण काळात गावकरी,
आदेशचे शिक्षक आणि आप्त स्वकीय मोठ्या खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे
राहिल्यानेच हे साध्य झाले. इयत्ता दहावीत असलेल्या आदेशचा काल, शुक्रवार २१ फेब्रुवारी रोजी मराठी विषयाचा पहिलाच पेपर होता. त्यातच वडील
ठानेश्वर कटरे यांचा पहाटेच्या सुमारास आकस्मिक निधन झाले. वडिलांचा मृतदेह दारात
असताना परीक्षेला जावे तरी कसे? या प्रश्नाने त्याच्या मनात
काहूर माजलं होतं. मात्र मनात गोंधळ सुरु असतानाच पेपरला गैरहजर राहिल्याने पूर्ण
शैक्षणिक वर्ष वाया जाणार, हेही त्याच्या लक्षात आलं. आधी
परीक्षा, मग वडिलांवर अंत्यसंस्कार अखेर आदेशने मन घट्ट करुन
वडिलांचा मृतदेह दारात असताना पेपर देण्याचा निर्णय घेतला आणि मोहाडी येथील
परीक्षा केंद्रावर जाऊन मराठीचा पेपर दिला. पेपर संपल्यानंतर घरी येत वडिलांवर
अंत्यसंस्कारांचे सोपस्कार पूर्ण केले.