व्याजाच्या पैशासाठी मानसिक छळ; व्यापाऱ्याची आत्महत्या, सात जणांविरोधात गुन्हा दाखल

बीड :- व्याजाचे पैसे वेळेवर न दिल्याने पत्नीला माझ्याकडे आणून सोड, अशी धमकी देत सात वर्षांपासून मानसिक छळ सुरूच होता. अखेर या मानसिक त्रासाला कंटाळून एका व्यापार्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बीड शहरातील पेठ बीड परिसरात घडली. राम फटाले (वय अंदाजे ४५) असं मृताचे नाव आहे. दिलीप फटाले यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. राम याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत आपली व्यथा मांडली आहे.

काय घडलं नेमकं?
६ जुलै रोजी सकाळी राम फटाले नेहमीप्रमाणे उठला नाही. घरच्या लोकांनी पाहणी केली असता घरासमोरच्या अधर्वट बांधकामातील चौकटीला नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. तातडीने सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. चिठ्ठीतला आरोप रामने चिठ्ठीत लिहिले की, "डॉ. लक्ष्मण आश्रुबा जाधव आणि त्यांची पत्नी वर्षा यांनी सातत्याने मानसिक छळ केला. मी व्याजाची रक्कम परत केली, तरी ते दर महिन्याला २५ हजार रुपये घेऊन जात होते. पत्नीला माझ्याकडे आणून सोडण्याची धमकीही दिली." रामने सात वर्षांपूर्वी अडीच लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. लॉकडाऊनपूर्वीच रक्कम फेडली होती, तरीही जाधव यांनी बँकेचे चेक परत दिले नव्हते. माझा दहावा-तेरावा करू नका आपल्या चिठ्ठीत रामने लिहिले – "माझ्या मातीसाठी समाजाकडून वर्गणी गोळा करा. माझा दहावा, तेरावा करू नका. मी चांगला पती, मुलगा, वडील होऊ शकलो नाही. मला माफ करा." या सात जणांवर गुन्हा पेठ बीड पोलिसांनी डॉ. लक्ष्मण जाधव, पत्नी वर्षा जाधव, दिलीप उघडे, के.के. काशीद, मधू चांदणे, एक वारे नामक महिला व मस्के यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.