मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या – ६ महिने झाले तरी आरोपी फरार

बीड – मस्साजोग गावचे
सरपंच संतोष देशमुख यांची काही महिन्यांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या
प्रकरणात वाल्मिक कराडसह अनेक आरोपी मकोका अंतर्गत अटकेत असून सहा महिने
उलटल्यानंतरही प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे फरारच आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच संतोष
देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप करत स्पष्ट
इशारा दिला आहे. ते म्हणाले, "फरार आरोपी कृष्णा
आंधळेला अटक करा, ही आमची वारंवार मागणी आहे. परंतु अद्याप
कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आमच्या कुटुंबाच्या जीविताला धोका आहे. जर लवकरात
लवकर अटक केली नाही तर मी कठोर निर्णय घेण्यास तयार आहे. याची सर्व जबाबदारी
प्रशासनावरच असेल."
धनंजय देशमुख यांनी हेही सांगितले
की, "या प्रकरणातील इतर आरोपींना तुरुंगात
व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते आहे. आम्ही त्यांना वेगवेगळ्या कारागृहात हलवण्याची
मागणी केली होती, परंतु काहीही झाले नाही. बीड कोर्टात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेल्या गाड्या, पदाधिकारी,
आरोपींच्या समर्थनार्थ मोठा जमाव येतो. यातून आमच्यावर दबाव आणला
जात आहे." सदर प्रकरणात सहा महिने उलटून गेले असूनही
आरोपीला अटक न झाल्यामुळे पीडित कुटुंब आता आणखी असुरक्षिततेच्या वातावरणात राहत
असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.