महाराष्ट्रात मोठा प्रशासनिक फेरबदल; राज्यभरातील 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई – महाराष्ट्रात महायुती सरकारकडून वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरुच असून आता तब्बल 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही अधिकाऱ्यांना प्रमोशन तर काहींचे डिमोशन झाले आहे. राज्यभरातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, धुळे, हिंगोली, जळगाव या प्रमुख जिल्ह्यांतील पोलिस प्रशासनात मोठे फेरबदल झाले आहेत. महेंद्र पंडित यांची बृहन्मुंबई पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांचीही मुंबईत पोलिस उपायुक्तपदी बदली झाली आहे. यासोबतच विजय पवार, सुनिल लोखंडे, नम्रता पाटील आणि स्मिता पाटील यांचीही मुंबई पोलिस उपायुक्तपदी पदोन्नतीवर नियुक्ती झाली आहे. यामुळे मुंबई पोलिस दलात पाच नव्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भर पडली आहे. दरम्यान, मागील १५ दिवसांपूर्वी 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, तर गेल्या आठवड्यात पुन्हा ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी झाले होते. त्यानंतर आता मोठ्या प्रमाणावर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. राज्य सरकारने हे फेरबदल कायद्याचा अंमलबजावणी यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या हेतूने केल्याचे सांगितले जात आहे. काही बदल्या स्थानिक मागणीनंतर तर काही वरिष्ठ पातळीवरील निर्णयामुळे झाल्या आहेत.