निकृष्ट जेवणप्रकरणी मोठी कारवाई : आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द

मुंबई : शिंदेगटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील
कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्याला
बेदम मारहाण केली होती. हा प्रकार ८ जुलै रोजी रात्री घडला. घटनेनंतर व्हिडिओ सोशल
मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या प्रकरणामुळे राज्यभरात चर्चेचे
वादळ उठले होते. विधानसभेतही या घटनेचे पडसाद उमटले. आता या प्रकरणावर मोठी कारवाई
करत आमदार निवासातील अजंता केटरर्सचा परवाना रद्द करण्यात आला आहे. एफडीए
विभागाच्या तपासणीतही अनियमितता आढळली. आमदार संजय गायकवाड
यांनी निकृष्ट जेवणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अन्न
व औषध प्रशासन (FDA) विभागाने तातडीने कारवाई करत तपासणीचे
पथक पाठवले. या पथकाने कॅन्टीनच्या स्टोअर रूमची तपासणी करत खाद्यपदार्थांचे आणि
तेलाचे नमुने गोळा केले आहेत. हे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात
आले असून, लवकरच त्याचा अहवाल सादर होणार आहे.
नेमकं काय घडलं होतं?
मंगळवारी रात्री १० वाजता आमदार गायकवाड यांनी कॅन्टीनमधून जेवण
मागवले होते. पहिला घास घेताच अन्नात खराब वास आल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी सर्वांना अन्नाचा वास घ्यायला सांगितला असता तेही खराब असल्याचे
उपस्थितांनी मान्य केले, असे त्यांनी सांगितले. या कारणावरून
त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला “माझ्या पद्धतीने समजावले”.
गायकवाड यांनी केलेले गंभीर आरोप गायकवाड म्हणाले, “मी ३० वर्षांपासून येथे जेवण करतो. अनेकदा निकृष्ट जेवणाची तक्रार केली.
अंडी १५ दिवस जुनी, नॉन-व्हेज १५-२० दिवस जुने, भाज्या २-४ दिवस जुन्या असतात. अनेकांना अन्नात पाल, उंदीर, दोरी सापडते.” त्यांच्या या आरोपामुळे
प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सध्या तपासणी सुरू असून
अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे कॅन्टीन
व्यवस्थापन आणि दर्जाबाबत प्रशासनाने कठोर पावले उचलावी, अशी
मागणी केली जात आहे.