महायुतीचा विजय इव्हीएममुळेच श्रेयासाठी लाडक्या बहिणींचा वापर खासदार प्रणिती शिंदे यांचा पुनरूच्चार

सोलापूर : राज्यात आलेली महायुतीची सत्ता इव्हीएम- मतदान यंत्रातील घोटाळ्यामुळेच आली आहे. मात्र इव्हीएमवरून लक्ष विचलित करण्यासाठी लाडक्या बहिणींना विजयाचे श्रेय दिले जात आहे. घोटाळा लपविण्यासाठी लाडक्या बहिणींच्या नावाचा वापर केला. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम करायचे होते परंतु लाडकी बहीण पुढे आणून त्यांनी जे करायचे तेच केले.अशा शब्दात खासदार प्रणिती शिंदे यांनी इव्हीएम घोटाळ्याचा पुनरूच्चार केला. मंगळवारी येथील शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी बोलतांना खासदार शिंदे यांनी लाडकी बहीण योजना, राज्यातील विस्कळीत अर्थकारण, सोलापूरची रखडलेली विमानसेवा, केंद्र आणि राज्य सरकारचे विविध आघाडींवरील अपयश आणि आक्रमक धार्मिक विधानांबद्दल आपली रोखठोक मत व्यक्त केली. खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, राज्य सरकारकडे आता इतर योजनांसाठी पैसेच नाहीत. कारण, सगळे पैसे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरवापरले आहेत. सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे. आता 9 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून काढले जाणार आहे.महापालिकेतील प्रशासकांच्या सातत्याने बदल्या होत आहेत. त्यामुळे कामे होत नाहीत. महानगरपालिका निवडणूक लवकरात लवकर झाल्या पाहिजेत, सर्व काही सुरळीत होईल, असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला आहे. मंत्री नीतेश राणे यांच्याकडून एका विशिष्ट समाजघटकाबद्दल वारंवार होणार्‍या आक्रमक विधानांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलतांना आपण अशा वक्तव्याला महत्व देत नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.  आम्ही आकाशाकडे बघत आहोत. मागील सहा महिन्यांपासून आम्ही आकाशाकडे पाहतोय सोलापूरातून विमान कधी उडणार, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन विमानतळाचे लोकार्पण केले, पण विमानसेवा काही सुरू झाली नाही. आपण नागरी उड्डाण मंत्री यांच्याशी चर्चा करून विमानसेवा सुरू करण्याबाबत मागणी केली, आम्ही विमानसेवेसाठी प्रयत्न करतोय परंतु इगोचा प्रश्न येतो, त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न होतो. येत्या काही दिवसात काँग्रेस पक्षाकडूनच विमानसेवा सुरू होईल असा टोला लगावतांना सत्ताधार्‍यांकडून अडथळे न येण्याची अपेक्षही खासदार शिंदे यांनी व्यक्त केली.