दहावीचा राज्य निकाल जाहीर; ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग अव्वल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण यांनी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विभागनिहाय जाहीर करण्यात आलेला हा निकाल विद्यार्थ्यांना आज दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येणार आहे. निकाल जाहीर करण्यापूर्वी मंडळाचे अध्यक्ष त्रिभूवन कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत निकालासंदर्भातील माहिती दिली. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून एकूण १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत ९७.६२ टक्के निकालासह राज्यात अव्वल स्थान कायम राखले आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा ८८.४१ टक्के लागला आहे. निकालाच्या आकडेवारीनुसार मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.९६ टक्के असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५६ टक्के आहे. मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत ५.४० टक्क्यांनी अधिक लागला आहे. निकाल लवकर जाहीर करण्यासाठी यंदा दहावीची परीक्षा १० दिवस आधी घेण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळ स्तरावर समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती. नऊ विभागीय मंडळांमध्ये हेल्पलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती.

विभागनिहाय निकाल:

  • कोकण – ९७.६२%
  • कोल्हापूर – ९५.४७%
  • मुंबई – ९४.९७%
  • पुणे – ९४.२४%
  • नाशिक – ९०.९३%
  • अमरावती – ९०.५०%
  • नागपूर – ८९.०७%
  • लातूर – ८८.४२%
  • छत्रपती संभाजीनगर – ८८.४१%