महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र प्रकरणात पोलिसांची कारवाई, कुस्तीविश्वात खळबळ

मुंबई : पंजाब पोलिसांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख याला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे. राजस्थानातील कुख्यात पपला गुर्जर गँगशी त्याचे थेट संबंध असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सिकंदरला रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्याच्याकडून शस्त्रास्त्रांसंबंधी महत्त्वाचे पुरावे मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

 कुस्तीविश्वात खळबळ – वस्तादांचा संताप

या घटनेनंतर कुस्ती विश्वात मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील प्रसिद्ध गंगावेश तालीममध्ये प्रशिक्षण घेतलेल्या सिकंदरवर त्याचे गुरू आणि ज्येष्ठ पैलवान नाराज आहेत. हिंदकेसरी दीनानाथ सिंग यांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले – सिकंदरनं लाल मातीचा आणि तालीम संस्कारांचा अपमान केला आहे. तो खरा महाराष्ट्र केसरी नाही. पैशासाठी असं करणं म्हणजे कुस्तीच्या संस्कृतीचा अपमान आहे.” त्यांच्या या वक्तव्याने कुस्ती क्षेत्रातील असंतोष अधिकच वाढला आहे.

 कुटुंबीयांचा दावा – “हा राजकीय कट आहे”

दुसरीकडे, सिकंदरच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर झालेल्या आरोपांना फेटाळून लावत हा राजकीय आणि खेळाडूविरोधी कट” असल्याचे म्हटले आहे.
सिकंदरचे वडील रशीद शेख म्हणाले – मी आयुष्यभर हमाली केली, कधी हरामाचा पैसा घेतला नाही. माझा मुलगाही तसाच आहे. त्याच्याकडे शेकडो गदा, स्पर्धा जिंकलेल्या आहेत. हिंदकेसरी स्पर्धा जवळ आली आहे, त्यामुळे त्याला खेळू न देण्यासाठीच हा डाव रचला गेला आहे.” त्यांनी चौकशीत सत्य बाहेर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

 सिकंदर शेखचा कुस्ती प्रवास

सिकंदर शेख हा भारताच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संघाचा सदस्य राहिला असून, महाराष्ट्र केसरी किताब जिंकलेला आहे. अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. त्याच्यावर आलेल्या गंभीर आरोपांमुळे कुस्ती क्षेत्र आणि चाहत्यांमध्ये संताप आणि धक्का व्यक्त केला जात आहे.