नववर्ष स्वागतासाठी मोठी सवलत; ३१ डिसेंबरला हॉटेल्स व बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्ष २०२६ चे जल्लोषात स्वागत
करण्यासाठी सज्ज झालेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ३१
डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि आर्केस्ट्रा बार पहाटे ५ वाजेपर्यंत
सुरू ठेवण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात आदेश
जारी केला असून, ही सवलत फक्त बंदिस्त (इनडोअर)
आस्थापनांसाठीच लागू असणार आहे. खुल्या जागा, टेरेस, मोकळी मैदाने किंवा ओपन-एअर कार्यक्रमांसाठी ही वेळवाढ लागू होणार नाही.
त्यामुळे नागरिकांना बंदिस्त हॉटेल्स, क्लब आणि हॉलमध्ये
पहाटेपर्यंत नववर्षाचा जल्लोष करता येणार आहे.
सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कायदा
व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्यभरात पोलिसांनी विशेष तयारी केली आहे.
शहरातील प्रमुख चौक, नाके आणि गर्दीच्या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात
करण्यात आला आहे. विशेषतः दारू पिऊन वाहन चालवणे आणि अंमली पदार्थांच्या
वापराविरोधात पोलिसांची करडी नजर राहणार आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद
भारंबे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “नागरिकांनी
आनंदात आणि उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत करावे, मात्र
कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर
कारवाई केली जाईल.” दरम्यान, या निर्णयामुळे हॉटेल
व्यवसायिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, पर्यटन
आणि नाईटलाइफला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात
आहे.