मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा — शेतकऱ्यांसाठी ११ हजार कोटींच्या मदत योजनेला मंजुरी
मुंबई | २८ ऑक्टोबर: राज्य
मंत्रिमंडळाची आज मुंबईत बैठक पार पडली. या वादळी बैठकीत मराठवाड्यातील
अतीवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यावरून तीव्र चर्चा झाली. बैठकीनंतर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि शेतकऱ्यांसाठी करण्यात
आलेल्या मदतीचा आढावा सादर केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आतापर्यंत ८ हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात
आली आहे. जवळपास ४० हजार शेतकऱ्यांना या निधीचा लाभ मिळाला आहे. आजच्या बैठकीत
आम्ही आणखी ११ हजार कोटी रुपयांच्या मदतीला मंजुरी दिली आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “हा निधी बजेटमधील
नाही, परंतु आपत्कालीन स्वरूपात जिल्हानिहाय वाटप केला जाईल.
काही शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतची मदत मिळाली आहे; त्यांना
तीन हेक्टरपर्यंत अतिरिक्त मदत देण्यात येईल.” काही
शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये तांत्रिक कारणांमुळे पैसे पोहोचले नाहीत, याबाबतही फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “आम्ही १५
ते २० दिवसांत सर्व पात्र शेतकऱ्यांना मदत पोहोचवू. काहींच्या बँक अकाउंटमध्ये
समस्या असल्याने निधी रिलीजमध्ये अडचणी येत आहेत. पण एकही पात्र शेतकरी वंचित
राहणार नाही.” तसेच त्यांनी सांगितले की, शेतीमाल खरेदीबाबत राज्य सरकारने रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू केली असून
त्यानंतर खरेदीला गती दिली जाईल. फडणवीस यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.
हवामानातील बदलांमुळे नुकसान झाले असले तरी सरकार त्यांच्यासोबत आहे.”