महाल हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाईंड फहीम खान न्यायालयीन कोठडीत

नागपूर:  महाल परिसरात झालेल्या हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान याला सत्र न्यायालयाने ११ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. आज (सोमवारी) गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ही कारवाई केली. गणेशपेठ पोलिसांना त्याला केव्हाही पोलिस कोठडीत घेण्याची मुभा देण्यात आली आहे. तपासात असे समोर आले आहे की, फहीम खानच्या चिथावणीखोर वक्तव्यांनंतर शेकडो युवकांनी एकत्र येऊन हिंसक हल्ला केला होता. त्यामुळे त्याच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यापैकी एक देशद्रोहाचा गुन्हा आहे.

देशद्रोहाचा गुन्हा आणि पोलिस कोठडी: गणेशपेठ पोलिसांनी फहीम खानला अटक केल्यानंतर त्याने पोलिसांवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक करून सत्र न्यायालयात सादर केले होते. त्यानंतर ३१ मार्चपर्यंत त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आता ११ एप्रिलपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्याने त्याला गणेशपेठ पोलिसांना केव्हाही कोठडीत घेता येईल, अशी परवानगी न्यायालयाने दिली आहे.