पाकमधील मदरसे बंद, शाळांमध्ये आपत्कालीन प्रशिक्षण सुरु

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली असून, या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताकडून होणाऱ्या संभाव्य सैन्य कारवाईच्या भीतीने पाकिस्तानने 1,000 हून अधिक मदरशांना पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या हल्ल्यात १९ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेक जखमी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईसाठी तिन्ही सैन्यदलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. सीमेवर हालचालींमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, रॉयटर्सच्या अहवालानुसार पाकिस्तानकडे विश्वसनीय गुप्त माहिती आहे की भारत लवकरच मोठ्या प्रमाणावर सैन्य कारवाई करणार आहे. यामुळे नियंत्रण रेषेजवळील भागात पाकिस्तानकडून गोळीबारही सुरु आहे..दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रूबियो यांनी भारत व पाकिस्तानच्या नेत्यांशी चर्चा करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पहलगाम हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानने सहकार्य करावे, अशीही विनंती त्यांनी केली आहे. पीओकेमध्ये धार्मिक विभाग प्रमुख हाफिज नजीर यांनी सर्व मदरशांना १० दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. मुजफ्फराबाद शहरात विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी हल्लेखोरांचे पोस्टर जाहीर केले असून, त्यामध्ये दोन पाकिस्तानी आणि एक स्थानिक दहशतवाद्याचा समावेश आहे. हे सर्व दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असून, त्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. माहिती देणाऱ्याला २० लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. भारताच्या सैन्य कारवाईच्या तयारीमुळे पाकिस्तान पुरता हादरला आहे. काही अहवालांनुसार, पाकिस्तानने चीनकडून रणगाड्यांची मागणीही केली आहे. मात्र भारताच्या सैन्य ताकदीपुढे पाकिस्तान टिकू शकत नाही, हे त्यांनाही माहीत असल्याचे स्पष्ट होत आहे.