माढा : सुधारित पाणीपुरवठा योजनेस मान्यता द्यावी
.jpeg)
माढा, दि. १०-
शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेस तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर परिषद प्रशासन संचालनालयास आज दिल्या असल्याचे दादासाहेब साठे यांनी सांगितले. या सुधारित योजनेमुळे माढ्याच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यास मदत होणार आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांची मुंबईत दादासाहेब साठे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी माढा शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता मिळावी, अशी मागणी केली. पाणीपुरवठा योजनेची सद्यः परिस्थिती सांगून नगरपंचायतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत माढा नगरपंचायतीचा ५२ कोटी ७२ लाख रुपये रकमेचा सुधारित पाणीप्रवठा योजना
प्रकल्प तयार केला आहे. सदर प्रस्तावास तांत्रिक मान्यता घेऊन प्रशासकीय मान्यतेसाठी सदर
प्रस्ताव नगर परिषद प्रशासनाकडे दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले. यावेळी पवार यांनी नगर
परिषद प्रशासन संचालनालयास फोनवरून या प्रस्तावास तत्काळ प्रशासकीय मान्यता देणेकामी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
माढा शहराची पाणीपुरवठा योजना आष्टी (ता. मोहोळ) येथील तलावावर राबविण्यात आली आहे. ही योजना ग्रामपंचायतकालीन असून ३० वर्षे जुनी झाली आहे. सर्व पाइपलाइन जीर्ण झाले आहेत. त्यामुळे वारंवार गळती होऊन शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने शहरासाठी सुधारित पाणीपुरवठा योजना राबविणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन नव्या योजनेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या सुधारित योजनेस मंजुरी मिळाल्यास माढा शहराच्या पाणीपुरवठ्याची समस्या सूटणार आहे.