माढा : १० वर्षीय कार्तिकची निर्घृण हत्या; मृतदेह कालव्यात आढळला, परिसरात भीतीचं वातावरण

माढा, सोलापूर: अरण (ता. माढा)
येथील १० वर्षीय कार्तिक खंडाळे याचा मृतदेह तुळशी-मोडनिंब रस्त्यावर असलेल्या
कोरड्या कालव्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कार्तिक १५ जुलैपासून
बेपत्ता होता.
तो शेवटचा गावातील मैदानात खेळताना दिसला होता. “यात्रेत जाऊन येतो”
असे सांगून तो घराबाहेर पडला होता. १९ जुलै रोजी सकाळी अरण येथील प्रमोद सरडे
यांनी दुर्गंधीमुळे कालव्याच्या पट्टीवर पाहिले असता त्यांना मृतदेह आढळला.
त्यानंतर टेंभुर्णी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू
केला असून, कालव्याजवळ एक चाकू व रक्ताचे डाग सापडले आहेत.
मृतदेह कुजलेला असून, चेहरा छिन्नविच्छिन्न आहे.
घटनास्थळी श्वानपथकही दाखल झाले होते, मात्र
प्रगती होऊ शकली नाही. पोलिसांनी जादा फौजफाटा मागवून परिसर सील केला. कार्तिकची
हत्या करण्यात आली का, की तो नरबळीचा बळी ठरला, यावर चर्चांना उधाण आले आहे. गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,
पालकांमध्ये अस्वस्थता आहे. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या
नेतृत्वाखाली टेंभुर्णी पोलिस तपास करत आहेत.