कोलकात्यात लिओनेल मेस्सीचे आगमन; खेळ न पाहता आल्याने चाहते संतप्त, स्टेडियममध्ये गोंधळ

दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी ‘GOAT इंडिया टूर’ अंतर्गत भारतात दाखल झाला असून, त्याच्या तीन दिवसीय भारत दौऱ्याची सुरुवात कोलकात्यात झाली आहे. 2022 फिफा वर्ल्ड कप विजेत्या अर्जेंटिना संघाचा कर्णधार असलेला मेस्सी कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि दिल्ली या चार शहरांना भेट देणार आहे. कोलकात्यात लेक टाऊनमधील श्री भूमी स्पोर्टिंग क्लब येथे त्याच्या ७० फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

मात्र, सॉल्ट लेक स्टेडियममध्ये आयोजित मुख्य कार्यक्रमात मेस्सीला खेळताना पाहण्याची संधी मिळाली नाही. तो अवघ्या काही मिनिटांसाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहून निघून गेल्याने चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. संतप्त चाहत्यांनी कार्यक्रमाच्या खराब व्यवस्थापनाचा आरोप करत स्टेडियममध्ये बाटल्या व खुर्च्या फेकून गोंधळ घातला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एका चाहत्याने प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मेस्सी फक्त १० मिनिटांसाठी आला आणि निघून गेला. सर्व नेते आणि मंत्री त्याच्याभोवती जमा झाले होते. आम्हाला त्याची एकही झलक नीट पाहायला मिळाली नाही. तो खेळला नाही, पेनल्टीही घेतली नाही. आमचा वेळ, पैसा आणि भावना वाया गेल्या.” १४ वर्षांनंतर भारतात आलेल्या मेस्सीच्या स्वागतासाठी कोलकात्यात मोठा उत्साह होता. विमानतळावरही चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्याला मागील दाराने हॉटेलमध्ये नेण्यात आले. त्यामुळे आगमनाच्या वेळीही अनेक चाहते निराश झाले होते. अखेर स्टेडियममध्येही अपेक्षित अनुभव न मिळाल्याने चाहत्यांचा संताप उफाळून आला.