नागपुरात बिबट्याचा धुमाकूळ; पारडी परिसरात पहाटे हल्ला, चार नागरिक जखमी

राज्यातील अनेक भागांमध्ये बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आज पहाटे नागपूर शहरातील पारडी परिसरात बिबट्याने अचानक काही नागरिकांवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर बिबट्या पारडी भागातील एका दुमजली इमारतीत लपल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या घटनेनंतर वनविभाग आणि पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला. बिबट्या लपून बसलेल्या घराच्या आसपास कोणालाही प्रवेश न देण्याचे आदेश देण्यात आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन डार्ट मारले. मात्र गुंगीच्या अवस्थेतही बिबट्याने सुमारे १५ फूट उंच उडी मारत दुसऱ्या गच्चीत जाण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने गुंगी वाढल्याने तो गच्चीवरून खाली पडला, त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र घटनास्थळी जमलेल्या मोठ्या गर्दीमुळे आणि सततच्या आवाजामुळे बचावकार्यादरम्यान अडचणी निर्माण झाल्या. दोन दिवसांपूर्वी कापसी परिसरातही बिबट्या दिसून आला होता. याआधी पारडी भागात दोन बिबट्यांनी दहशत निर्माण केली होती. त्यापैकी एकाला पकडण्यात यश आले, मात्र दुसऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभाग अपयशी ठरल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. दरम्यान, नागपूरसह नाशिक, रायगड आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे.